रामाचा वनवास म्हणजे सामाजिक एकात्मतेचे एक अद्वितीय उदाहरण

रामाचा वनवास हा भारताला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न होता

रामाचा वनवास म्हणजे सामाजिक एकात्मतेचे एक अद्वितीय उदाहरण

नागरी राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद याची चर्चा स्वातंत्र्यापासून बराच काळ चालत आली आहे. पण बदलत्या मानसिकतेमुळे आणि देशवासीयांमध्ये झालेल्या नव्या जागृतीमुळे याला नवे रूप प्राप्त झाले आहे. या वादाची मुळे स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा मिळतात; परंतु त्यावेळी स्वातंत्र्यप्राप्तीस सर्वोच्च प्राधान्य दिले गेल्यामुळे तेव्हा हा वाद मागे पडला.

जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यावर नागरी राष्ट्रवादास मोठी चालना मिळाली. नेहरू हे पाश्चात्य संकल्पनांनी खूप प्रभावित झाले होते व भारताचा प्राचीन इतिहास आणि त्याची मूल्ये याविषयी त्यांना फारसे प्रेम नव्हते. स्वाभाविकच नागरी राष्ट्रवादाच्या संकल्पनेस राजकीय आश्रय मिळाला. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींमुळे डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, के. एम. मुन्शी, यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले गेले नाही. परंतु, भारतास मात्र नागरी राष्ट्रवादामुळे कठोर किंमत चुकवावी लागत आहे.

 

शतकानुशतके परकीय शक्तींच्या घुसखोरी आणि हल्ल्यांनंतरही भारताला एक गतिमान राष्ट्र म्हणून टिकवून ठेवण्यासाठी “संस्कृती” ही एक प्रमुख शक्ती होती हे ते नाकारतात.  त्यांच्या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, बहुसांस्कृतिकता, सहिष्णुता यासारख्या विविध संज्ञा ते वापरतात. पण ‘आपुलकीची भावना’ ही राष्ट्राची प्रमुख आणि निर्णायक आवश्यकता आहे, हे समजण्यात ते चूक करतात; आपुलकीची ही भावना प्रेमातून जन्माला येते. शतकानुशतके राजकीय आक्रमणे होऊनही भारतीय संस्कृतीने काही मूल्ये धरून ठेवली आहेत. खरे तर हीच भारतीय मूल्यांची खरी ताकद आहे कारण ती या राष्ट्राच्या मानसिकतेवर सतत अधिराज्य गाजवत आहेत. विविधतेच्या नावाखाली हे स्पष्ट आहे की काही अनैसर्गिक, वरवरची आणि कृत्रिम वैशिष्ट्ये, जी भारताच्या एकतेचा तथाकथित अभाव दर्शवण्यासाठी मांडली जातात.

हे वास्तव आहे की, अनेक दशकांपासून राजकीय संरक्षणामुळे नागरी राष्ट्रवादाने आपली ध्येय-धोरणे यशस्वीपणे लादली आहेत. निरागसतेमुळे अनेक लोक वाहवत जातात. शतकानुशतके एकसंध ठेवणाऱ्या शक्तींबद्दल भारतीयांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवले जाते. विचारवंतांनी इतिहास दडपण्याचा किंवा तो विकृत पद्धतीने मांडण्यापर्यंत मजल मारली, हे बौद्धिक अप्रामाणिकतेचे चपखल उदाहरण आहे.

नागरी राष्ट्रवादाच्या समर्थकांचा हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि दुष्ट हेतू लोकांना आता कळला आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद ही आता सर्वत्र स्वीकारली जाणारी संकल्पना आहे. रामजन्मभूमी आंदोलन हे सांस्कृतिक राष्ट्रवादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यामध्ये लोकांनी सर्व मतभेद आणि फुटीरतावादी घटक बाजूला सारून अयोध्येतील मंदिरास पाठिंबा दिला. रामजन्मभूमी आंदोलन हे कोणत्याही भौतिक फायद्यासाठी नव्हते, तर पिढ्यानपिढ्या दडपला गेलेला आत्मसन्मान जपण्यासाठी होते, लोकांच्या लक्षात आले आहे की, राम ही भारतीयांना एकसंध ठेवणारी एक मोठी शक्ती आहे. अयोध्येत मंदिराच्या उभारणीमुळे, राम ही पुन्हा नव्या उर्जेसह एकत्र आणणारी शक्ती म्हणून स्थापित होत आहे.

 

रामजन्मभूमी आंदोलन हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात व्यापक आंदोलन आहे. चार दशकांनंतर या आंदोलनाचा तर्कपूर्ण शेवट होणार आहे. परंतु त्याचे गुणात्मक परिणाम लक्षात घेतल्यास, या आंदोलनास एखाद्या कालमर्यादेत अडकवून ठेवणे अत्यंत चुकीचे ठरेल. या आंदोलनाने भारतीय मानसिकता बदलली, जी आता राष्ट्रवादी बनली आहे. हा बदल स्वातंत्र्यानंतर नागरी राष्ट्रवादाच्या समर्थकांनी जे पेरले आणि योजले होते त्याच्या विरुद्ध होता. आपल्या जीवनातील शाश्वत मानवी मूल्यांमुळे अनेक सहस्र वर्षांपासून रामाचा भारतीयांवर प्रभाव आहे. समाजवादी विचारवंत आणि नेते डॉ राम मनोहर लोहिया यांचेच उदाहरण घ्या. लोहिया हे नास्तिक होते आणि त्यांनी कधीही देवावर विश्वास ठेवला नाही. त्यांच्यासाठी देव ही एक काल्पनिक कथा होती. परंतु डॉ लोहिया यांनी ‘राम, कृष्ण अँड शिव’ या विस्तृत पुस्तकात ही तीन भारतीय प्रतीके समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. डॉ लोहिया यांनी पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की, रामाचा वनवास हा भारताला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न होता कारण त्याचा विस्तार हा सुदूर उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत होता. डॉ लोहिया यांच्या या प्रतिपादनासोबतच असेही म्हटले जाऊ शकते की, रामाचा वनवास ही केवळ भारताच्या भौगोलिक अखंडतेसाठी निर्मित संकल्पना नव्हती, तर ती सामाजिक एकात्मतेचे एक अद्वितीय उदाहरण देखील होती.

प्रथम आपण भौगोलिक अखंडतेवर लक्ष केंद्रित करूया, रामाचा वनवास हा भारतवर्षाची नैसर्गिक सीमा असलेल्या हिमालयाच्या तळाशी वसलेल्या अयोध्येपासून सुरू होतो, रामायण काळात नेपाळ हा भारताचाच भाग होता. १८ व्या शतकात नेपाळ अस्तित्वात आला. नेपाळ आणि भारत यांच्यातील सध्याची सीमा मानवनिर्मित किंवा कृत्रिम आहे. हिमालय पर्वतरांगा ही भारतवर्षाची नैसर्गिक सीमा आहे. त्याचप्रमाणे श्रीलंका हा नेहमीच भारतवर्षाचा विस्तार मानला गेला आहे. श्रीलंकेत अजूनही हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो, हा देशही वसाहतवादाचा बळी होता. विशेष म्हणजे, श्रीलंकेने ‘सिलोन’ वरून ‘श्रीलंका’ असे नाव बदलून आपली प्राचीन ओळख पुनर्स्थापित केली.

 

रामायणासह अनेक प्राचीन भारतीय साहित्यात श्रीलंकेच्या नावाचा उल्लेख आहे. रामाच्या वानरांच्या (माकडांच्या) सैन्याने बांधलेला रामसेतू हा श्रीलंका बेट आणि भारतीय मुख्य भूमी यांच्यातील संबंधाचा आणखी एक पुरावा आहे. भगवान राम यांचा अयोध्या ते श्रीलंका प्रवास पाहिला तर असे दिसून येते की त्यांनी भारतीय उपखंडाचा मोठा भाग व्यापला होता. आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांतून त्यांनी अयोध्येपासून श्रीलंका असा प्रवास केला, व शेवटी त्यांनी श्रीलंकेत प्रवेश केला. वायव्य पश्चिमेकडील काही भाग वगळता, भगवान रामाने वनवासाच्या काळात जवळजवळ सर्व भारतीय खंड व्यापला.

 

अयोध्या ते लंकेपर्यंतचा त्यांचा प्रवास, पूर्वीच्या भारतातील जंगलांमधून त्यांनी प्रवास केलेल्या ठिकाणांच्या उत्कृष्ट वर्णनांसह सुंदरपणे चित्रित केला गेला आहे. त्यात रात्रीचे आकाश आणि वेगवेगळ्या ताऱ्यांची स्थिती, या ठिकाणच्या वनस्पती, प्राणी आणि भूतलाचे वर्णन आहे. हे अशा रीतीने, पूर्वीच्या भारतीय उपखंडाचे सर्व भौगोलिक वर्णन करते.

भगवान रामांनी अयोध्येपासून प्रवास आरंभ केला आणि तमसा नदी ताल (उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील मर्दाह), शृंगवेरपुर (सध्याचे सिंगरौर), उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (किंवा प्रयागराज), मध्य प्रदेशातील चित्रकूट, मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात वसलेला शरभना मुनी आश्रम, आताच्या तेलंगणातील भद्राचलम, आता नाशिक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंचवटी, नागपूर मधील रामटेक, कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील ऋष्यमूक पर्वत, कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील पंपा सरोवर, कर्नाटक किनारपट्टीवरील मलय पर्वत, तमिळनाडूमधील त्रिच्छिरापल्ली आणि रामेश्वरम या मार्गाने ते श्रीलंकेस पोहोचले. श्रीलंकेत किमान नऊ ठिकाणे आहेत, जी भगवान रामाशी संबंधित आहेत. त्यात नुवारा एलिया, मुन्नेश्‍वरम मंदिर, मनावरी मंदिर, डोलुकांडा संजीवनी पर्वत, जाफन्याजवळील निलावरी, लग्गाला, दुनुविला, याहांगला आणि दिवुरुमपोला यांचा समावेश आहे.

ही सर्व स्थळे आजही अत्यंत आदराने जपली जातात कारण भगवान रामांनी या परिसरातून प्रवास केल्यामुळे भक्तांना त्याचा बहुमान वाटतो. या सर्व स्थळांना हिंदूंच्या मनात महत्त्वाचे स्थान आहे कारण ती पवित्र शहरे म्हणून ओळखली जातात. परंतु भगवान राम यांचा वनवास केवळ भौगोलिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही कारण त्याचे सखोल सामाजिक महत्त्व आहे, जे तत्कालीन सामंजस्यपूर्ण आणि कर्तव्यनिष्ठ समाजरचनेचे प्रतिबिंब आहे. सध्याच्या परिभाषेत, समाजातील सर्व घटकांनी रामाला सहकार्य केले आणि रामाने या सर्व घटकांना सहकार्य केले. रामाने ऋषींचे राक्षसांपासून संरक्षण केले, तर केवटाने त्यांना गंगा नदी पार करण्यास मदत केली. रामांनी आपल्या वनवासाचा बराच काळ दंडाकारण्यामध्ये घालवला, जिथे ते जंगलात राहणाऱ्या (वनवासी) लोकांच्या संपर्कात आले. दंडकारण्यामध्ये कोणताही अडथळा न येता ते राहिले. स्थानिक जनजातीय रहिवाशांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची चिडचिड; अटल सेतू बांधला पण अटलजींचा फोटो कुठे होता?

भारतातील सर्वात लांब सागरी सेतूबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का?

‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’

भूत पिशाच निकट नही आवे…

रामायणात पंचवटीला विशेष स्थान आहे कारण सीतेचे अपहरण, जटायूचा वध, शूर्पणखेचा वध आणि अगस्ती मुनींच्या अग्निशाळेतून शस्त्रे मिळवणे या प्रमुख घटना येथे घडल्या. येथे रामांना सर्व लोकांचे सहकार्य लाभलेले दिसते. भगवान रामांची वृत्ती यावरून समजू शकते की त्यांनी जटायूचे अंतिम विधी एखाद्या मानवाप्रमाणे केले. असे मानले जाते की, ऋष्यमूक पर्वत परिसरात, राम आणि लक्ष्मण हनुमानाला भेटले होते, जे जंगलात राहणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात.

 

शबरी मातेची प्रसिद्ध घटना कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील पंपा सरोवराजवळ घडली. शबरी माता भिल्ल समाजातील होती. वाली आणि सुग्रीव यांच्यातील संघर्षाची घटनादेखील राम वनवासाच्या काळात घडली, जेव्हा रामाने पीडित पक्ष असलेल्या व वंचित आणि दुर्बल घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुग्रीवाला पाठिंबा दिला. रामाने रावणाचा भाऊ बिभीषण याचेही रक्षण केले, जो दुर्बल वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. बिभीषणाचे कुळ त्याला रामाचे संरक्षण मिळवण्यामध्ये आडवे आले नाही. रामाला इतरांबद्दल काही पूर्वग्रह असता तर असे कधीच घडले नसते. निषाद आणि भगवान राम यांच्यातील परस्पर मैत्रीदेखील या वस्तुस्थितीची साक्ष देते की, राम नेहमीच मानवी संबंधांना महत्त्व देत.

 

श्रीराम हे विष्णूचे अवतार मानला जातात. काही विद्वान भारतातील अंतर्गत लढा दर्शवण्यासाठी नेहमी शैव आणि वैष्णवांमधील संघर्ष दाखवून देतात. विशेष म्हणजे श्रीलंकेतील मुन्नेश्‍वरम मंदिरात रामाने शिवाची प्रार्थना केल्याचे मानले जाते. भगवान राम यांनी श्रीलंकेतील मनावरी मंदिरातही शिव लिंगाची स्थापना केली. अशा प्रकारे, राम हे सिद्ध करतात की शैव आणि वैष्णव यांच्यात काही फरक नव्हता. दोन्ही प्रवाह रामात एकरूप झालेले दिसतात.

अशा प्रकारे, राम हे भारतीय इतिहासातील एकात्मता आणि सामाजिक समरसतेचे सर्वात मोठे प्रतीक म्हणून उभे आहेत. ते सांस्कृतिक राष्ट्रवादाचे सर्वांत योग्य प्रतीक आहेत, ज्यात आपुलकीची दृढ भावना असलेल्या सर्व लोकांचा समावेश आहे.

Exit mobile version