रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता केवळ ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील. काशीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली १२१हून अधिक वैदिक ब्राह्मण १६ ते २२ जानेवारीपर्यंत अनुष्ठान करतील. प्राणप्रतिष्ठेपूर्वी ६० तासांपर्यंत यज्ञ, हवन, चार वेदांचे पारायण आणि कर्मकांडांचे वाचन होईल आणि ५६ भोग अर्पित करून रामलल्लाची पहिली आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.
प्राणप्रतिष्ठेचे अनुष्ठान १७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता सुरू होऊन दुपारी एक वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर दुपारी तीन वाजता अनुष्ठान सुरू होऊन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालेल. म्हणजे दररोज सुमारे १० ते १२ तास मंत्रपठण, हवन पूजन होईल. असे दररोज २१ जानेवारीपर्यंत होईल. २२ जानेवारी रोजी रामलल्ला भव्य गर्भगृहात विराजमान होतील.
१७ जानेवारी… संकल्प पूजन, वेद मंत्रोच्चार
१७ जानेवारी रोजी संकल्प, गणपती पूजन, मातृका पूजन आणि पुण्यवचन होईल. यावेळी चारही वेदांमधील मंत्रांचे पठण केले जाईल. मंडपात उत्तरेच्या दिशेला अथर्ववेद, पूर्वेला ऋग्वेद, दक्षिणेला यजुर्वेद आणि पश्चिमेला सामवेदचे विद्वान बसतील. वेगवेगळे विद्वान १८ पुराणांचे पठण करतील.
१८ जानेवारी… शरयू नदीने स्नान
१८ जानेवारीला शरयू नदीचे १२१ कलश पाण्याने रामलल्लाच्या मूर्तीला स्नान घातले जाईल. त्यानंतर भव्य शोभायात्रा अयोध्यानगरीत काढली जाईल.
१९ जानेवारी… विविध विधी
१९ जानेवारी रोजी घृताधिवास, मध्वाधिवास, अन्नाधिवास, पुष्पाधिवास हे विधी होतील. घृताधिवासमध्ये मूर्तीवर एक धागा बांधून दोन-दोन मिनिटे तुपात ठेवला जाईल. मध्वाधिवासमध्ये मूर्तीला मधाने भरलेल्या भांड्यात ठेवतात. अन्नाधिवासमध्ये मूर्तीला तांदळाने झाकतात. तर, पुष्पाधिवासमध्ये संपूर्ण मूर्तीवर फुले वाहिली जातात.
२० जानेवारी… रामलल्ला करणार शयन
शैयाधिवासचे अनुष्ठान २० जानेवारीला होईल. म्हणजे संपूर्ण रात्र रामलल्ला शयन करतील. त्यानंतर संपूर्ण दिवस अनुष्ठान चालत राहील. त्यानंतर मूर्तीला गर्भगृहात स्थापित केले जाईल.
हे ही वाचा :
मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार
विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे निकाल जाहीर!
मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी
सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद
२१ जानेवारी… न्यास मंत्रांचा जप
मूर्तीचे शीर, कपाळ, नखे, नाक, चेहरा, गळा, डोळे, केस, हृदयापासून पायापर्यंत सर्व भागात प्राण फुंकण्यासाठी दोन तासांपर्यंत न्यास मंत्रांचा जप केला जाईल.
२२ जानेवारी प्राणपतिष्ठा
अभिजित मुहूर्तावर २२ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर ५६ भोग अर्पित करून रामाची आरती केली जाईल.