उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली असून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. विदेश भाविकांनाही याची भुरळ पडली असून हा अध्यात्मिक मेळावा अनुभवण्यासाठी ते खास भारतात दाखल झाले आहेत. महाकुंभ मेळ्याचा दुसरा दिवसही मोठ्या उत्साहात सुरू झाला असून पवित्र स्नान करण्यासाठी आणि अध्यात्मिक अनुभूती अनुभवण्यासाठी भाविक जमू लागले आहेत. विदेशी नागरिक महाकुंभ मेळ्यासह भारताचे कौतुक करत आहेत.
महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून अनेक महिला यात्रेकरू आल्या आहेत. वृंदावनमध्ये राहणाऱ्या रशियातील प्रियमा दासी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही आमच्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आणि सनातन धर्माचा प्रचार करण्याच्या उद्देशाने येथे आलो आहोत. आम्हाला हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. लोकांना वास्तविक जीवनाबद्दल, धर्माबद्दल, या जगात ते खरोखर आनंदी कसे राहू शकतात याबद्दल आठवण करून द्यायची आहे. येथे खूप छान व्यवस्था केली असून सगळीकडे पोलिस आहेत आणि ते मदत करत आहेत.”
पेरू येथील माधवी दासी या आणखी एका भक्ताने एएनआयला सांगितले की, “या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने स्वतःला मी खूप भाग्यवान समजते. भक्ती योग आणि सनातन धर्माविषयीचे ज्ञान घेऊन आम्ही येथे आलो आहोत. आता गंगेत स्नान करण्यासाठी आणि सर्वांसोबत आध्यात्मिक साधना करण्यासाठी उत्सुक आहे. हे खूप पवित्र आहे. तसेच हे खूप प्रभावी आहे.”
अमेरिका येथील मकेश्वरी दासी यांनी एएनआयला सांगितले की, “मला असे वाटते की, आम्ही एका अतिशय शुद्ध आणि पवित्र ठिकाणी आलो आहोत. भारतातील सर्व लोकांना पाहत आहे. त्यांच्याबरोबर एकत्र असून स्नान घेतले. त्यांच्यासोबत जप करत आहोत. खूप भाग्यवान आहे की आम्हाला फक्त भारतातच नाही तर प्रयागसारख्या आध्यात्मिक ठिकाणी यायला मिळाले.” आणखी एका विदेशी भक्ताने म्हटले की, “भारताचा आत्मा या क्षणी खूप शक्तिशाली आहे. गुरु आणि शनि संरेखित आहेत. महाकुंभ हा केवळ भारतासाठी नाही, तर महाकुंभ सर्व जगासाठी आहे, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
ऑनर किलिंग रोखण्यासाठी ‘सुरक्षागृह’ निर्णयाची अंमलबजावणी करावी
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार
भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याला भाविकांचा भरघोस प्रतिसाद!
भारत बांगलादेश संबंध आणखी ताणले!
महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी स्पेन, इटली, अमेरिका, जर्मनी आदी देशांतील भाविक आले आहेत. महाकुंभ ही जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची धार्मिक सभा आहे, जी भारतातील चारपैकी एका ठिकाणी दर १२ वर्षांनी आयोजित केली जाते. महाकुंभ- २०२५, हा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालेल.