६४ वर्षांनी होत आहे पाकिस्तानातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार

१ कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी मंजूर

६४ वर्षांनी होत आहे पाकिस्तानातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार

पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बाओली साहिब हिंदू मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी जीर्णोद्धाराचा पहिला टप्पा म्हणून एक कोटी पाकिस्तानी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यातील बाओली साहीब हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाकिस्तान सरकारने एक कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल ६४ वर्षांनंतर आता या मंदिराचं बांधकाम करण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर या गावातील हिंदू नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. १९६० पासून हे मंदिर जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्यकांच्या प्रार्थनास्थळाशी संबंधित असलेली ‘इव्हाक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट’ ही संस्था या मंदिराचे बांधकाम करणार आहे, अशी माहिती ‘द हिंदूस्तान टाईम्स’ने दिली आहे. या मंदिराचा पाया खोदण्याचे काम सुरु झालं आहे. या मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर पाक धर्मस्थान समितीकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास ६४ वर्षांनंतर या मंदिरांचे बांधकाम होत असल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे.

हे ही वाचा :

क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द

पंजाब दहशतवादी कट प्रकरण: दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रमुख साथीदारावर आरोपपत्र दाखल

…म्हणे मंदिरातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण वाढते!

बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया

गेल्या ६४ वर्षांपासून या गावात हिंदू धर्मियांसाठी कोणतेही प्रार्थनास्थळ नसल्याने येथील हिंदू नागरिकांना पुजा करण्यासाठी लाहोर किंवा सियालकोट येथील मंदिरांमध्ये जावं लागत होते. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम करावं, अशी मागणी येथील गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. पाक धर्मस्थान समितीकडूनही गेल्या २० वर्षांपासून या मंदिराच्या बांधकामासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर आता या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले. यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत.

Exit mobile version