रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर रामनगरी अयोध्येत भाविकांच्या गर्दीला पूर आला आहे. दररोज दीड ते दोन लाख रामभक्त रामलल्लाच्या दरबारात येत आहेत. १८ दिवसांत सुमारे ४० लाख भक्तांनी रामलल्लाच्या दरबारात दर्शन आणि पूजा केली आहे. दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. एका अंदाजानुसार, १७ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमीला एक कोटी भाविक अयोध्येला येऊ शकतात. प्रशासन आतापासूनच गर्दी नियंत्रण योजनेच्या कामाला लागले आहे. त्यासाठी विविध पर्याय चाचपडून पाहिले जात आहेत.
रामनवमीचा मेळा नऊ दिवस होतो. मुख्य पर्व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामजन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. यंदाची रामनवमी १७ एप्रिल रोजी होत आहे. उत्सवाचा प्रारंभ चैत्र नवरात्रीच्या शुभारंभासह होईल. नऊ दिवस अयोध्येत कथा, प्रवचनांसह अन्य अनुष्ठाने होतील.
गेल्या वर्षी रामनवमीला सुमारे सव्वा दोन भक्तांनी अस्थायी मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तर, अयोध्येत २५ लाख भाविकांची गर्दी लोटली होती. आता तर रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहेत. १०० फूट रुंद रामजन्मभूमी पथ तयार झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर रामनवमीला किमान एक कोटी भाविक भेट देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:
ईडीच्या कारवाईविरोधात वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव
सलमान खुर्शीद यांच्या पत्नीसमोरील अडचणींत वाढ
गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा
गर्दी वाढल्यास क्षीरेश्वरनाथ मंदिराच्या समोर रामजन्मभूमीच्या गेट नंबर तीनपासून भाविकांना पाठवले जाईल. ४० फूट रूंद हा मार्गही तयार आहे. सुरुवातीला हा मार्ग केवळ व्हीआयपींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तसेच, मंदिराच्या उत्तर दिशेलाही एक नवीन रस्ता बनवला जात आहे. रेल्वे स्थानकाला राम जन्मभूमी पथाशी जोडण्याकरिता सुग्रीव पथ तयार करण्याचीही योजना आहे.