द. आफ्रिकेचा केशव महाराज ‘ओम’ लिहिलेल्या बॅटने होता खेळत; फोटो व्हायरल

केशव महाराजच्या बॅटवर हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह ओम कोरलेलं होतं

द. आफ्रिकेचा केशव महाराज ‘ओम’ लिहिलेल्या बॅटने होता खेळत; फोटो व्हायरल

सध्या क्रिकेट विश्वचषकाचा रणसंग्राम भारतात रंगला असून मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होता. अनपेक्षितपणे या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफिकेला नमवत पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. विशेष म्हणजे नेदलँडचे २४५ धावांचे आव्हान आफ्रिकेला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ २०७ धावात गारद झाला.

आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि केशव महाराज यांनी झुंज देत प्रतिकार केला. मात्र, इतर फलंदाजांकडून त्यांना फारशी साथ मिळाली नाही. डेव्हिड मिलरने ४३ तर केशव महाराजने ४० धावांची खेळी केली. केशव महाराजने लुंगी एन्गिडीसोबत शेवटच्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. त्याच्या खेळीसोबतच त्याच्या बॅटचीही चांगलीच चर्चा रंगली होती. भारतीय मूळ असलेल्या केशव महाराजच्या बॅटवर हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह ओम कोरलेलं होतं. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

केशवचे पूर्वज सुमारे दीडशे वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे स्थायिक झाले होते. या कारणास्तव त्यांचे भारताशी घट्ट नाते आहे. केशव याची सनातन परंपरा आणि हिंदू धर्मावर गाढ श्रद्धा आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा केशव महाराज याने तिरुअनंतपुरममधील पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेतले होते. तसेच त्याचे फोटोही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.

हे ही वाचा:

“मी पळालो नाही, पळवण्यात आलं” ललित पाटीलचा आरोप

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात आला. नेदरलँडने २४५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर ४३ षटकात २४६ धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट झाली होती. अखेर आफ्रिकेने या विश्वचषकातील पहिल्या पराभवाची नोंद केली.

Exit mobile version