मंदिरे तर उघडणार; पण प्रसाद, फुलांवर फुली

मंदिरे तर उघडणार; पण प्रसाद, फुलांवर फुली

राज्यामध्ये उद्यापासून मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. घटस्थापनेच्या निमित्ताने आता भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु हार किंवा प्रसाद मात्र मिळणार नसल्यामुळे भाविक थोडे हिरमुसलेही आहेत. प्रत्येक मंदिरांनी स्वतःची अशी एक दर्शन नियमावली आता जाहीर केलेली आहे. बहुसंख्य मंदिरांमध्ये हार, नारळ, प्रसाद स्विकारला जाणार नाही असा नियमच तयार केलेला आहे.

मंदिरे उघडणार याच बातमीमुळे महाराष्ट्रामधील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आद्यदैवत म्हणून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही उद्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज १० हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. मुंबादेवी मंदिरामध्ये दिवसभरात केवळ अडीच ते तीन हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. महालक्ष्मी मंदिरात मात्र आठ हजार भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आलेली आहे.

घटस्थापनेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे. रोज १० हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहे. त्यातील ५ हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर ५ हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. तर पंढरपूरमधील भक्तांना सकाळी ६ ते ७ असा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तासाला १ हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

 

हे ही वाचा:

मुल्ला बरादर-हक्कानी नेटवर्क संघर्ष उघड

अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यात या महत्त्वाच्या विषयावर करणार चर्चा

फसवणुकीनंतर पैसे मिळाले; पण सायबर चोरटे फरार

मूडीजची भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सकारात्मक’ प्रशस्ती

 

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. क्युआर कोड दाखवल्यानंतर शरीराचे तापमान व्यवस्थित असेल आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, ६५ वर्षांवरील नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर मंदिरात फुले, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दर्शनास येणारे भाविक दोन्ही लसींचे डोस घेतलेले असावेत असाही नियम लागू करण्यात आलेला आहे.

Exit mobile version