माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षांना बसण्यासाठी मुस्लिम मुलींना बुरखा घालून परवानगी देण्यासंदर्भातील पत्रकाबाबत मत्स्योद्योग आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आक्षेप घेतला असून असे कुणाचेही लांगुलचालन खपवून घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या वर्षीचे एक परिपत्रक माझ्या हाती आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेबाबतचे हे पत्रक असून त्यात मुस्लिम मुलींना परीक्षेदरम्यान बुरखा घालण्याची परवानगी देण्यात आल्याचे म्हटले होते. पण मी यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे की, असे लांगुलचालन चालणार नाही. या देशात राहात असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो, तो मुस्लिम विद्यार्थ्यांनाही लागला पाहिजे या दृष्टिकोनातून मी माहिती घेतली आहे.
नितेश राणे म्हणाले की, बुरखा घालून परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत. सुरक्षेचाही प्रश्न आहे. संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाच्या संबंधी काय करता येईल ते बघावे आणि तो निर्णय मागे घ्यावा. तो मागे घेतला असेल तर ठीक नाहीतर तो मागे घेण्यात यावा. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही. यासाठीच हे पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या चुकांमुळे भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याची संधी मिळाली
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातून सहा रॉकेट्स जप्त
राणे यांनी सांगितले की, हा जीआर २०२४चा आहे. मी माहिती मागवली आहे की, असा नियम लागू केलेला आहे का? कारण असे लाड करण्याची आवश्यकता नाही. पत्रासंदर्भात एकदा संपूर्ण माहिती आली की, मी पावले उचलणार.
परीक्षेला बुरखा घालून दोन विद्यार्थी आलेत की त्यात विद्यार्थीनी आहे हे कळत नाही. मतदानादरम्यानही असे घडलेले आहे. त्यामुळे असे कुणाचेही लांगुलचालन करू नये. बुरखा घालून कोण आले असेल तर तो किती प्रामाणिकपणे तो परीक्षा देत आहे का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
जेव्हा कुणी बुरख्याबाबत आक्षेप घेतो तेव्हा हे आमच्या धर्माविरोधात आहे, असे म्हटले जाते. पण बाकी धर्माची मुले जर आपल्या धर्माचा प्रसार तिथे करणार नसतील तर मुस्लिमांनाही ती मुभा नसावी, अशी टिप्पणीही राणे यांनी केली.