जय बाबा विश्वनाथ!

जय बाबा विश्वनाथ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तीर्थक्षेत्र काशीमध्ये बाबा विश्वनाथ धामचे लोकार्पण झाले. इच्छाशक्ती दांडगी असेल तर अशक्य ते शक्य करता येते. अनेक छोट्यामोठ्या इमारती, मंदिरांचा गराडा असलेल्या या परीसरातील सर्व बांधकामे हटवून मूळ काशी विश्वेश्वराच्या मंदीर परीसराला अधिक भव्य आणि सुंदर बनवणे हा काही सोपा खेळ नव्हता. परंतु प्रशासनावर पकड असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवले. कोणत्याही कोर्टबाजी आणि तंट्याशिवाय त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन हा परीसर मोकळा केला. सौंदर्यीकरणाचा मार्ग खुला केला. विस्थापितांना दिलेल्या रकमेचा आकडा सुमारे ४०० कोटी इतका घसघशीत आहे.

हाती सत्ता आली की जमेल तसा पैसा ओरबाडून समुद्र किनारी आलिशान बंगले आणि रिसॉर्ट बांधण्या इतपत हे नक्कीच सोपे नव्हते. हे खडतर काम मार्गी लावण्यासाठी योगींसारखा खमका मुख्यमंत्री हवा होता. योगी अपेक्षेला खरे उतरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रुप दिले. देशात हिंदूंच्या सामर्थ्याची पताका जेव्हा जेव्हा उंच उंच फडकली तेव्हा देशात मंदिरांचे कळस तेजाने तळपले. जेव्हा हे सामर्थ्य कमकुवत झाले तेव्हा मंदीरांवर घणाचे घाव पडले. मंदिरांची गोपुरे जमीनदोस्त झाली. सोरटी सोमनाथाचे मंदीर, रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी आणि काशीविश्वेश्वराचे मंदीर आक्रमकांनी वेळोवेळी लक्ष्य केले. मंदिरातील संपत्तीच्या लुटीसोबत हिंदूंना लज्जित करणे, त्यांचा मानभंग करण्याचा हा त्या मागील खरा उद्देश होता. काशीने आक्रमकांच्या या क्रूर यातनांचा अनुभव अनेकदा घेतला. हिंदूंच्या मनगटातील पौरुषाने वारंवार रक्ताचे अर्ध्य देऊन अपमानाचे हे कंलक धुवून काढले. मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा मार्ग प्रशस्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘इथे जेव्हा औरंगजेब मातला तेव्हा कुठे तरी छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले, सालार मसूद इथे आला तेव्हा राजा सुहेलदेवाने हिंदूना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. इंग्रजांच्या काळातही हेस्टींग या अधिकाऱ्याचे काय हाल झाले हे काशीच्या लोकांना ठाऊक आहे.’

थोडक्यात सांगायचे तर मंदिरांचा जीर्णोद्धार केवळ पैशाने झाला नाही, त्याला नेहमीच पौरुषाचा आधार होता. मोदींच्या कारकीर्दीत मंदिरे पुन्हा मोकळा श्वास घेतायत. खरे तर स्वतंत्र भारतात सोरटी सोमनाथाचा उद्धार झाल्यानंतर श्री रामजन्मभूमी आणि काशी विश्वेश्वराचा उद्धार व्हायला हवा होता. परंतु हे ऐतिहासिक कार्य मोदींच्या हाताने व्हावे हीच ईश्वरी इच्छा असावी. आज बाबा विश्वनाथांच्या मंदीर परीसराचे सौदर्यीकरणाचा टप्पा पार पडला, नजीकच्या काळात इथे भव्य मंदीर उभारण्यात येईल याबाबत कुणाच्याही मनात संशय नाही.

हे ही वाचा:

अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

करीना कपूरला कोरोनाची लागण

मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या

देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मोदींनी सर्वसामान्य नागरीकांसाठी शौचालय बांधली, घर बांधली, घरा घरात वीज पोहोचवली, रस्ते बांधले. प्रत्येक भारतीयाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत होते. पण हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा, सनातन हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या मंदिरांचा त्यांना विसर पडला नाही. एकेकाळी ही मंदिरेच हिंदूंचे सामर्थ्य आणि सनातन संस्कृतीची केंद्रबिंदू होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघ म्हणून वाराणसीची निवड करताना बहुधा मोदींना या शहराच्या आध्यात्मिक वारशाची भुरळ पडली असावी. त्यांच्या डोळ्यासमोर त्यावेळी या प्राचीन शहराचा कायापालट करण्याचे स्वप्न असावे. त्याचा रोडमॅपही असावा. गेल्या सात वर्षांच्या काळात या शहराचा झालेला कायापालट थक्क करणारा आहे. जणू या शहराने कात टाकलेली आहे. मोदींच्या कारकीर्दीत वाराणसीत ८ हजार ३०० कोटी रुपयांची विकास कामे झाले. येत्या तीन वर्षात आणखीन ५ हजार कोटींची विकास कामे होणे अपेक्षित आहे. इथे इमारतींच्या दाटीमुळे मेट्रो रेल्वे शक्य नसल्यामुळे स्वित्झर्लंडच्या धर्तीवर इथे केबल चालवण्यात येणार आहे. या योजनेवर ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरात सध्या ८४ घाट असून राजघाटाच्या पुढे खिडकीया हा ८५ वा घाट बनवण्यात येणार आहे. या घाटावर ओपन थिएटर, जिम आणि योगा सेंटर सारख्या सुविधा असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी गंगेच्या पात्रात चालणाऱ्या दोन हजारपैकी २०० बोटींना सीएनजी इंजिन बसवण्यात आले आहे. गंगेच्या पात्रात पर्यटनाला गती देण्यासाठी चार क्रूझ चालवण्यात येत आहेत. १३०० कोटी रुपयांचा रिंगरोड, विमानतळासाठी ९०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. इथल्या ६९४ गावांना इंटरनेटने जोडण्यात आले आहे.

काशी ही मोक्षाची भूमी आहे. इथे मृत्यूही भयकंपित करत नाही. कणाकणात मांगल्याचा वास असलेली वाराणसी नगरी आता प्राचीन आणि नूतन, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा अभूतपूर्व संगम बनते आहे. मोदींची विकासदृष्टी हे घडवते आहे. कित्येक दशकानंतर गंगेचे पात्र वाराणसीचा हा बदलता चेहरा पाहते आहे. सत्तेवर आल्यानंतर मोदींनी दिलेली सब का साथ, सब का विकास ही घोषणा हिंदुत्वातील सर्वसमावेशकतेतून आलेली आहे. मोदी कधी हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीत. कारण त्यांची देहबोलीच हिंदुत्वाशी घट्ट नाते सांगते. कपाळाला गंध लावणारा, गंगेच्या तटावर आरती करणारा, नदी पात्रात उतरून सूर्याला अर्ध्य देणारा हा नेता देशाच्या सनातन संस्कृतीला झळाळी देतो आहे. त्यांच्या प्रत्येक पावलामुळे देश गतवैभवाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. काशीचा बदललेला चेहरा देशाला नवी उर्जा देईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version