मुघल साम्राज्याच्या विरोधात बंड पुकारून लढा देणाऱ्या हिंदू राजांपैकी बहुतेकांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते. अशाच एका वीर पराक्रमी लढवय्या राजावर नवी वेब सिरीज आली आहे. ते योद्धा म्हणजे बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल! एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर छत्रसाल नावाची एक नवीन वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. गुरुवार २९ जुलै रोजी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
२१ जुलै रोजी या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती लाभली आहे. दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीत जवळपास एक कोटी लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे. नीना गुप्ता, आशुतोष राणा, जितीन गुलाटी, वैभवी शांडिल्य, मनीष वाधवा, मनमोहन तिवारी, रुद्र सोनी अशी या सिरीजची स्टार कास्ट आहे. तर अनदी चतुर्वेदी यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.
गुरुवारी या सिरीजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला आहे. हा पाहिला सिझनच तब्बल २० भागांचा तयार करण्यात आला आहे. ज्यापैकी प्रत्येक भाग हा अंदाजे ४० ते ५० मिनिटांचा आहे. या सिरीजमध्ये सत्ताधुंद झालेल्या औरंगजेबाच्या भूमिकेत आशुतोष राणा यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. आशुतोष राणा यांनी रंगवलेल्या काही नकारात्मक भूमिका या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा औरंगजेब प्रेक्षकांच्या मनात घर करतो का याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
हे ही वाचा:
शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात
‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले
हसरंगाने भारताला रडवले…टी२० मालिकेवर लंकेची मोहर
तर महाराजा छत्रसाल यांच्या भूमिकेत जितीन गुलाटी असणार आहे. या आधी जितेन गुलाटी यांना एम.एस.धोनी, इनसाइड एज अशा चित्रपट आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांनी पहिले आहे. त्यांच्या या भूमिकांचे कौतुकही झाले आहे. पण आता त्यांनी साकारलेला छत्रसाल प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सिरिजचे ट्रेलर बघतानाच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ही सिरीज अतिशय कमी बजेटमध्ये बनवण्यात आली आहे. साहाय्यक अभिनेते आणि इतर अभिनेते, व्हीएफएक्स, नेपथ्य, या साऱ्यावर खूपच कमी खर्च करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी बाहुबली ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची कॉपी करण्याचा प्रयत्न सिरीजच्या निर्माणकर्त्यांनी केला असल्याची टीकाही अनेक समीक्षक करताना दिसत आहेत. पण या गोष्टी असल्या तरीही महाराजा छत्रसाल यांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच केला जात आहे. त्यामुळे या विषयाला हात घातल्याबद्दल निर्मात्यांचे नक्कीच कौतुक! एमएक्स प्लेयर या प्लॅटफॉर्मवर ही सिरीज मोफत बघणे शक्य आहे.