पाकिस्तानातील नव्या पिढीतील महिलांना आवडते साडी…

पाकिस्तानमधील सध्याच्या पिढीतील महिला, मुली या साडीकडे एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणून पाहतात.

पाकिस्तानातील नव्या पिढीतील महिलांना आवडते साडी…

झिया उल हक यांनी पाकिस्तानचे इस्लामीकरण करण्यास सुरुवात केल्यानंतर तिथे साडी हा महिलांचा वेशभूषेचा प्रकारच बंद झाला. पण आता पाकिस्तानातील नव्या पिढीतील मुली पुन्हा एकदा साडीकडे वळताना दिसत आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात विशेष वृत्त प्रसिद्ध केलेले आहे.

पाकिस्तानातील एक महिला आपल्या मुलांसह भारतात आली आणि इथे येऊन तिने एका युवकाशी विवाह केला. ती आता हिंदू असल्याचेही सांगत आहे. ती आपल्या पतीसह ग्रेटर नोएडा येथे भाड्याने राहात असताना त्यांच्या मालकाला त्याचा संशयही आला नाही, कारण त्या महिलेने साडी नेसली होती. वर्षभरापूर्वी पाकिस्तानी भरतनाट्यम नृत्यांगना शीमा खेरमाणी या साडी परिधान करून नृत्य करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

खेरमाणी म्हणतात की, माझी आई आणि माझ्या बहिणींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात साडीच परिधान केली. मी अगदी तरुण असल्यापासून साडी वापरत आहे. खेरमाणी म्हणतात की, झिया उल हक यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा कारभार सुरू झाल्यावर साडीची प्रथाच बंद झाली. भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्यांवरही बंदी आली. साडी हा इस्लामिक वेशभूषा नाही, असे सांगत त्यावर बंदी घातली गेली. पण मी साडी परिधान करते कारण ते बंडाचे प्रतीक आहे. इस्लामिक मूल्ये आणि विचारांचा सक्तीविरोधातील तो आवाज आहे. एवढेच नव्हे तर मी कपाळाला टिकलीही लावते. आमचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्याविरोधाला हे उत्तर आहे.

कराची येथील हिलाल सिल्कचे मालक तल्हा बाटला म्हणतात की, पाकिस्तानमधील सध्याच्या पिढीतील महिला, मुली या साडीकडे एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणून पाहतात. विशेषतः खास कार्यक्रमात त्या साडी परिधान करताना दिसतात. विवाह समारंभात अशा साडी परिधान केलेल्या महिला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. हिलाल सिल्क ही वस्त्रनिर्मितीतील एक कंपनी असून ते ७० वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत.

हे ही वाचा:

रेल्वेचे भाडे २५% टक्के पर्यंत होणार कमी; वंदेभारतचाही समावेश !

शरद पवारांनी सांगितले आणि अजितदादांनी खुर्ची खेचून घेतली!

गावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख

भारतात आलेल्या ‘सीमा’ला पुन्हा पाकिस्तानात पाठवा… मोदी सरकारकडे विनंती!

तूर्तास पाकिस्तानातील साड्यांची गरज कराचीतील बनारस या भागातून भागविली जाते. अर्थात, भारतातील बनारस आणि हे बनारस वेगळे आहे. हॅण्डलूम आणि पॉवरलूमच्या माध्यमातून या बनारसमध्ये साड्यांची निर्मिती केली जाते. बाटला म्हणतात की, भारतातून आलेल्या साड्या दुबईमार्गे पाकिस्तानात येतात पण सध्या पाक आणि भारतात व्यापार मोठ्या प्रमाणात होत नसल्याने तेवढी आयात होत नाही. पण भारतातील साड्यांना मागणी आहे. बनारसी, शिफॉन, रेशीम, जॉर्जेट, सुती साड्यांना पाकिस्तानात मागणी आहे. बाटला म्हणतात की, जरी भारत पाकिस्तान वेगळे झाले असले तरी कधीकाळी तो एकच देश होता. आमची पाळेमुळे एकच आहेत. आमच्या फॅशनच्या दुनियेचा साडी हा हिस्सा आहे.

फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेली अनेक कुटुंबात महिला साडीच परिधान करत असत. आयला खान ही दंतवैद्यक क्षेत्रात काम करते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती आपल्या घरात महिलांना साडी परिधान करताना पाहात आली आहे. त्यामुळे तीदेखील साडीला पसंती देते. शाळेतही तिने १५ वर्षांची असताना साडी परिधान केली होती. त्याबद्दल तिचे कौतुकही झाले होते. आता तिच्याकडे २५ साड्या आहेत. कराचीतील आयेशा झरी हिच्याकडे ३० साड्या आहेत. आम्ही पार्टी, लग्न यावेळी साड्या परिधान करतो अगदी ईदलाही आम्ही साडी परिधान करतो. पाकिस्तानातील चित्रपट तारकाही साडीच्या प्रेमात आहेत. रईस या चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हीदेखील काळ्या रंगाच्या साडीत दिसली होती. पाकिस्तानातील चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही अनेक अभिनेत्री साड्यांमध्ये दिसतात.

Exit mobile version