कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकात हिजाब वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकातील कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब न घालता परीक्षा देण्यास सांगितले असता, या विद्यार्थिनींनी परीक्षा देण्यास नकार दिला. आणि कॉलेजमध्ये आंदोलन करण्यास सुरवात केली.
उप्पिनगडीमधील सरकारी पीयू कॉलेजमध्ये कालपासून परीक्षा चालू झाली आहे. परीक्षेला काही मुस्लिम विद्यार्थी हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये आल्या होत्या. त्यावेळी कॉलेजने त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आठवण करून देत, हिजाब घालण्यास नकार दिला. यामुळे मुस्लिम विद्यार्थिनी आक्रमक झाल्या आणि कॉलेजमध्येच आंदोलन करण्यास सुरवात केली. या आंदोलनात २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये मुलांचाही समावेश होता.
विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षेला बसण्याची मागणी हे विद्यार्थी आंदोलनात करत होते. परिसरातील अनेक लोकांनी या विध्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र २३१ विद्यार्थी परीक्षेला न बसताच घरी गेले.
पियू कॉलेजने या विद्यार्थ्यांना उच्च आदेशाचा हवाला दिला होता. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला परीक्षेला बसता येणार नाही, असे पीयू कॉलेजच्या उपसंचालकांनी सांगितले आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाने हिजाब वादावर निकाल दिला आणि राज्य सरकारचा शैक्षणिक संस्थांबाबतचा आदेश कायम ठेवला. तसेच हिजाब बंदीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या सहा विद्यार्थिनींची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली
ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काश्मिरी पंडितांच्या अत्याचारास मुस्लिम जबाबदार!
“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”
कर्नाटक उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यांनंतर या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे वकील संजय हेगडे यांच्या निवेदनाची दखल घेतली आहे. दरम्यान, आगामी परीक्षांमुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी होणे आवश्यक आहे.