हिंदू धर्मात दुर्गा देवीची पूजा करणाऱ्या भक्तांसाठी नवरात्रीला खूप महत्त्व आहे. या नवरात्रीमध्ये लोक अनेकदा शक्तीपीठांना भेट देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीची प्रार्थना करतात. हिंदू धर्मानुसार, शक्तीपीठ म्हणजे पवित्र स्थान मानले जाते. भारताव्यतिरिक्त ही शक्तीपीठे बांगलादेश, पाकिस्तान, चीन, श्रीलंका आणि नेपाळमध्ये पसरलेली आहेत.
हिंगलाज हे पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ आहे. हे मंदिर बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाजच्या टेकड्यांमध्ये आहे. या मंदिरातील नवरात्रीचा उत्सव जवळपास भारतासारखाच आहे. हिंगलाज देवीच्या दर्शनासाठी भारतातून हजारो भाविक दरवर्षी पाकिस्तानला जात असतात. असं म्हटलं जातं की, अमरनाथपेक्षा हिंगलाजचा प्रवास अवघड आहे. या मंदिरातील नवरात्रीचा उत्सव जवळपास भारतासारखाच असतो.
मंदिराचे वैशिष्ट्य
हिंगलाज शक्तिपीठाला भेट देण्याऱ्या भाविकांमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेद केला जात नाही. हे मंदिर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातील लोकांना पूजनीय आहे. कधी-कधी मंदिरातील पुजारी आणि सेवक मुस्लिम टोप्या घातलेले दिसतात. त्याच वेळी, मातेच्या पूजेच्या वेळी मुस्लिम हिंदू भाविक एकत्र उभे असतात. त्यापैकी बहुतांश भाविक हे बलुचिस्तान-सिंधमधील आहेत. हिंगलाज मंदिराला मुस्लिम ‘नानी बीबी की हज’ किंवा ‘पिरगाह’ मानत असल्याने अफगाणिस्तान, इजिप्त आणि इराणमधील लोकही या पिरगाहला भेट देतात. भारताशिवाय बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमधूनही हिंगलाज देवीच्या दर्शनाला भाविक येतात. या मंदिराच्या आवारात उभारण्यात आलेली बहुतांश दुकाने मुस्लिम बांधवांची आहेत.
अमरनाथ यात्रेपेक्षा हिंगलाज मंदिरात पोहोचणे अवघड मानले जाते. ज्या काळात वाहने नव्हते त्यावेळी कराचीहून हिंगलाजला जायला ४५ दिवस लागायचे. आजही इथपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. वाटेत हजार फूट उंचीपर्यंतचे डोंगर, दूरवर पसरलेले निर्जन वाळवंट, जंगली प्राण्यांनी भरलेले घनदाट जंगल एवढंच नव्हे तर या भागात दहशतवाद्यांचीही भीती आहेचं. एवढा धोकादायक टप्पा पार केल्यावरच देवीचे दर्शन होते.
देवीच्या दर्शनासाठी घ्यावे लागतात दोन संकल्प
या मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना दोन संकल्प घ्यावे लागतात. कराचीमार्गे गेल्यास कराचीपासून १२ ते १४ किमी अंतरावर हव नदी आहे. येथूनच हिंगलाज यात्रेला सुरुवात होते. इथेच पहिला संकल्प घ्यावा लागतो. मंदिरात जाऊन परत येईपर्यंत भौतिक सुखापासून संन्यास घ्यावा लागतो. दुसरा संकल्प असा आहे की प्रवासादरम्यान कोणत्याही सहप्रवाशाला आपल्या कुंडातील पाणी द्यायचे नाही. हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी हे दोन्ही संकल्प भाविकांची परीक्षा घेण्यासारखे असतात. जो भाविक हे संकल्प पूर्ण करत नाही त्याचा प्रवास पूर्ण मानला जात नाही.
हे ही वाचा:
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?
फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी
… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा
ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक
हिंगलाज मातेची दंतकथा
राजा दक्ष, सतीचा पिता आपल्या मुलीने भगवान शिवाशी लग्न केल्यामुळे आनंदी नव्हता. तिने आपल्या एका मोठ्या विधीमध्येही भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही. त्यावेळी संतापलेल्या पित्याने अपशब्द बोलले. त्यामुळे दुःखी सतीने हवनकुंडात स्वत:ला जाळून घेतले. दुसरीकडे शिवाला याची माहिती मिळाली. त्यामुळे तो संतापला. शिवाने त्याचा एक केस उपटून जमिनीवर टाकला. ज्यातून वीरभद्र प्रकटला. वीरभद्र आणि शिवाचे इतर सदस्य लवकरच राजा दक्षाच्या ठिकाणी पोहोचले.
तेथे वीरभद्राने राजा दक्षाचा वध केला. भगवान शिवही तिथे पोहोचले. शिवाने सतीचा अर्धा जळालेला देह खांद्यावर घेतला आणि रागाने नाचू लागला. सर्व देवता आणि इतर प्राणी शिवाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पण शिव शांत झाला नाही. त्यानंतर भगवान विष्णूंनी एका चक्राने सतीचे ५१ तुकडे केले. सतीच्या याच ५१ तुकड्यांना शक्तीपीठ म्हणतात. हिंगलाज हे त्यापैकीच एक.