राज्यासह देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त अशा वातावरणात सण साजरे केले जात आहेत. दरम्यान, भारतात शक्तीपीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात ५१ शक्तीपीठ आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार, सतीच्या शरीराचे तुकडे, कपडे किंवा दागिने जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठे अस्तित्वात आली. यातील साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे कालीचे मंदिर असून कालीघाट मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे. हे काली मातेचे मंदिर देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. पौराणिक कथांनुसार, सतीच्या शरीराचे अवयव जिथे जिथे पडले ते शक्तीपीठ बनले. सतीच्या उजव्या पायाचे बोट याच ठिकाणी पडल्याचे मानले जाते. त्यामुळे कोलकाता येथील कालीचे मंदिर शक्तीपीठ बनले.
हुगळी नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराला दररोज हजारो भाविक भक्तिभावाने भेट देत असतात. गर्भगृहात माँ कालीची भव्य मूर्ती आहे. कालीघाट मंदिरातील कालीची देवता अद्वितीय आणि इतर काली प्रतिमांपेक्षा वेगळी आहे. या देवतेला तीन मोठे डोळे, चार सोन्याचे हात, सोन्याचे दात आणि लांब सोन्याची जीभ आहे. काली मातेच्या उग्र रूपाचे दर्शन कालीघाट मंदिरात होते.
कालीघाट मंदिराचा इतिहास आणि काली मातेची मूर्ती
माहितीनुसार, सध्याचं मंदिर हे १९ व्या शतकात बांधण्यात आलं आहे. मात्र, मंदिराचा उल्लेख १५व्या शतकात आणि १७व्या शतकात आढळून येतो. पूर्वी मूळ मंदिर ही एक लहान झोपडी होती, असे म्हटले जाते. १६व्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानसिंगाने याने मंदिर उभारले. सध्याच्या मंदिराचे बांधकाम हे १८०९ च्या सुमारास पूर्ण झाले.
देवी कालीची मूर्ती वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे. मूर्तीला तीन मोठे डोळे, चार हात आणि एक लांब जीभ आहे. संत आत्माराम गिरी आणि संत ब्रह्मानंद गिरी यांनी ही मूर्ती तयार केल्याची माहिती आहे.
कालीघाट मंदिराची आख्यायिका
सतीला तिच्या वडिलांनी पूजा समारंभासाठी आमंत्रित न केल्यामुळे तिने वडिलांशी भांडण करून संतप्त होऊन आत्मदहन केले. त्यावेळी शिवजी तांडव करत सतीचे जळत असलेले शरीर उचलून नेऊ लागले आणि तेव्हाच देवीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडले. यावेळी सतीच्या उजव्या पायाचे बोट कालीघाट येथे पडले आणि तिथेच नंतर मंदिर बांधले गेले. प्रमुख देवतेला कालिका म्हटले जाते आणि त्याच नावावरून या शहराला कोलकाता असे नाव पडले, असं मानलं जातं.
कालीघाट मंदिरासंबंधी अजून एक कथा अशी की, आत्माराम नावाच्या एका ब्राह्मणाला भागीरथी नदीत मानवी पायाच्या आकाराची दगडी रचना सापडली. त्यावेळी त्याने या दगडी रचनेची पूजा केली. त्याच रात्री त्याला स्वप्न पडले की, सतीच्या उजव्या पायाचे बोट नदीत पडले आहे आणि त्याला सापडलेली दगडाची रचना ही दुसरं तिसरं काही नसून सतीच्या उजव्या पायाचे बोट आहे. तसेच त्याला मंदिर देखील बांधायला सांगण्यात आले. त्यानंतर आत्माराम हे पायाच्या आकाराच्या दगडाची पूजा करू लागले.
हे ही वाचा:
युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी
काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच
गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा
देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे
कालीघाट मंदिरात कसे पोहचायचे?
कोलकाता हे प्रमुख शहर असल्यामुळे कोलकाता शहरातून मंदिरात जायला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कार, मेट्रो, लोकल, बस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कालीघाट मंदिर हे पहाटे ५ वाजता उघडते. तर दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत बंद राहते. संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडे राहते.