आज पासून नवरात्री सण सुरू होत असून राज्यासह देशभरात या सणाचा उत्साह दिसून येत आहे. यंदा निर्बंधमुक्त नवरात्र साजरी होत असल्यामुळे भाविकांमध्ये लगबग दिसून येत आहे. आपल्याकडे शक्तीपीठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशात ५१ शक्तीपीठं आहेत तर महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठं आहेत. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण या शक्तीपीठांबद्दल जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं आहेत तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. त्यापैकी तुळजाभवानी ही महिषासुरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी अशी ओळख असलेली ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेकांची कुलदेवता असून वर्षभर अनेक भाविक तुळजापूर येथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात.
या मंदिराचा इतिहास पाहता हे मंदिर नक्की कोणत्या काळातील आहे याबद्दल ठोस माहिती अजून समोर आलेली नाही. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ, तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः १३ व्या शतकात बांधले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येते. मध्ययुगातील अनेक ग्रंथ व बखरींत या देवीचा व क्षेत्राचा उल्लेख आढळतो. शिलालेखातही या मंदिराचा उल्लेख आढळतो.
तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. प्रतिमा एका उंच पीठावर विराजमान आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आहे. देवीचा डावा पाय जमिनीवर असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. तुळजा भवानीच्या मंदिराच्या काही भागाची रचना ही हेमाडपंती आहे. तुळजापुरात अनेक तीर्थे असून, त्यांपैकी ‘कल्लोळतीर्थ’, ‘गोमुखतीर्थ’ आणि ‘सुधाकुंड’ ही तीर्थे भवानी मंदिराच्या प्रकारात आहेत. तुळजापूरच्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोसले घराण्याची कुलदैवत असल्यामुळे कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. पण तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही, असं म्हटलं जातं.
विशेष म्हणजे साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते आणि पुन्हा सहजपणे जागेवर बसवता येते. वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवले जाते. याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने देवीचा निद्राकाल ओळखला जातो
छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात भगवती देवीबद्दल श्रद्धा होती. छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धेपोटीच असल्याचेही सांगितले जाते. छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानीने भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. सध्या तुळजाभवानी मंदिरात दोन प्रवेशद्वार आहेत, त्यांना छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची नावे देण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
श्री तुळजाभवानी मंदिर कुठे आहे?
औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अशा अनेक नावांनी ओळखली जाते. आश्विन आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.