नवरात्र २०२२: करवीर आणि महालक्ष्मीची गाथा

देशातील ५१ शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील प्राचीन कोल्हापूरात वसलेली श्री अंबाबाईचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणानुसार ‍आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष महत्व आहे.

नवरात्र २०२२:  करवीर आणि महालक्ष्मीची गाथा

देशभरात शारदीय नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा केला जातं आहे. आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या करण्यातं येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यामध्येसुद्धा शारदीय नवरात्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे यासोबतच शक्तीपीठांनाही आपल्याकडे खूप महत्व आहे. यानिमित्ताने आम्ही शक्तिपीठांबद्दल माहिती देत आहोत. कालच्या लेखात आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरची श्री तुळजाभवानीबद्दल जाणून घेतले. आजच्या लेखात आपण कोल्हापूरची श्री महालक्ष्मी म्हणजेच श्री अंबाबाई आणि अंबाबाई मंदिराबद्दल जाणून घेऊयात.

देशातील ५१ शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील प्राचीन कोल्हापूरात वसलेली श्री अंबाबाईचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणानुसार ‍आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष महत्व आहे. शक्तीपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास महत्व आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याचे म्हटले जाते.

मंदिराचे रहस्य :

श्री अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. वास्तुशास्त्रीय बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम झाले असावे. या मंदिराची निर्मिती चालुक्य राजवटीतील राजा कर्णदेव याने केली होती. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. सतराव्या शतकांनतर तत्कालीन अनेक बड्या व्यक्तींनी मंदिरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर हे महाराष्ट्राचे दैवत झाले. एक मध्यवर्ती मंदिर व त्याच्या तीन बाजूस तीन मंडप आणि तीन गर्भगृहे अशा पद्धतीची मंदिराची रचना आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून मंदिरावर पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे. मंदिराच्या परिसरात जवळपास ३५ लहान-मोठी मंदिरे आहेत. मंदिरात उभे असलेले स्तंभ अतिशय सुंदर आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भागावर सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. मूर्तीचे गर्भागृह ३० फूट लांब व २० फूट रुंद असे लंबचौकोनाकृती आहे.

अंबाबाई कशी प्रकट झाली याची एक पौराणिक कथा सांगितली जाते. असं म्हणतात, राजा दक्ष यांनी पेटवलेल्या अग्निकुंडात कन्या सतीने आहुती दिली. तिने आहुती दिल्यामुळे भगवान शंकर कन्या सतीचा देह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत होते. तेव्हा भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र वापरून सतीच्या देहाचे जे भाग केले ते भाग पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. या १०८ भागांमधील ज्या ठिकाणी डोळे पडले त्या ठिकाणी लक्ष्मी प्रकट झाली, अशी कथा वर्षानुवर्षे सांगितली जाते.

देवीचे वैशिष्ट्य :

देवीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. मूर्तीचे वजन साधारणतः चाळीस किलो आहे. देवीला चार भूजा आहेत. डोक्यावर मुकूट व शेषनाग आहे. बहुधा मंदिरांचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असते मात्र, येथील देवी पश्चिममुखी आहे. या मंदिराची खासियत म्हणजे, मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. प्रत्येक वर्षी मार्च व सप्टेंबर महिन्याच्या २१ तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मिळ व लाभदायक मानण्यात येते. मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या देवीच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी असते. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो.

Exit mobile version