उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मोठा निर्णय घेत उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य केले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस एन पांडे यांनी ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्यांना याबाबत आदेश जारी केला आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्राथनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे.
रमजान महिन्यात मदरशांमध्ये ३० मार्च ते ११ मे या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १२ मे पासून नियमित मदरशे सुरू झाले. त्यामुळे आजपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशे सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इतर प्रार्थनेसह राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे, असे २४ मार्च रोजी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!
आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
“आत्तापर्यंत मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सहसा हमद (अल्लाहची स्तुती) आणि सलाम (मुहम्मद साहब यांना अभिवादन) वाचले जात होते. काही ठिकाणी राष्ट्रगीतही गायले जात होते, मात्र ते बंधनकारक नव्हते. आता ते अनिवार्य करण्यात आले आहे,” अशी माहिती शिक्षक संघ मदारीस अरबियाचे सरचिटणीस दिवाण साहेब जमान खान यांनी दिली आहे. “मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे,” असे राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी म्हणाले.