शालिवाहन शकांच्या नावाचे चक्र

शालिवाहन शकांच्या नावाचे चक्र

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा! आजपासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. आज एकमेकांना शुभेच्छा देताना वेगवेगळ्या स्वरूपात दिल्या जातात. गणित आणि संस्कृतच्या अभ्यासक डॉ. मेधा लिमये यांनी एका अनोख्या स्वरूपात या शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. मेधा लिमये यांनी एका संदेशात शालिवाहन शक कसं काढतात? त्याचं नाव कसं निश्चित करतात? किती नावं आहेत? इत्यादींबाबत थोडक्यात माहिती लिहीली आहे.

“गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

हा दिवस हिंदू नववर्षदिन. या दिवसापासून नवीन संवत्सर सुरू होते. पंचांगात साठ संवत्सरांचे एक चक्र मानले गेले आहे. या साठ संवत्सरांना विशिष्ट नावे आहेत. आज सुरू झालेले संवत्सर ‘प्लव’ नावाचे आहे. हे पस्तिसावे शकनाम आहे. इसवी सनातून ७८ वजा करून शालिवाहन शक येते. आजपासून शक १९४३ चा प्रारंभ होत आहे. या शकसंख्येत १२ मिळवून आलेल्या संख्येला ६० ने भागले असता जी बाकी उरते तिचा अंक संवत्सरांच्या यादीतील क्रमांकाशी जोडून संवत्सराचे नाव मिळते.१९४३+१२=१९५५÷६० या भागाकारात  बाकी ३५ येते म्हणून हे पस्तिसावे संवत्सर आहे. शुभकार्यात संवत्सरनाम उच्चारले जाते. प्लव या संस्कृत शब्दाचा एक अर्थ नदीचा पूर असा आहे. त्यामुळे बहुधा या नावाच्या संवत्सरात पाऊस खूप पडतो असा समज आहे. पाहू खरेच असे होते का!”

-मेधा लिमये

या बाबत त्यांनी सांगितले की, “गुढी पाडव्याला लोक कविता वगैरे करतात, त्याही छानच असतात; परंतु मी काही हटके करण्याचा विचार केला. गुढी पाडव्याच्या निमित्ताने लोकांना शक, संवत्सर यांची माहिती थोडक्यात द्यावी या उद्देशाने हा पटकन छोटा मेसेज तयार करून पाठवला आणि लोकांना ही तो बऱ्यापैकी आवडला.”

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’, लॉकडाऊनची घोषणा करणार?

दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत

पार्ल्यातील पोस्टात सापडले अंमली पदार्थ

तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

यावेळी बोलताना त्यांनी संवत्सरांबाबत अधिक माहिती देखील पुरवली. त्या म्हणाल्या की, “संवत्सराची साठ नावं ही गुरूच्या भ्रमणाशी संबंधित आहेत. आपल्याकडे गुरूला फार महत्त्व आहे. त्यामुळे गुरू ग्रहाच्या भ्रमणाशी संवत्सराच्या चक्राशी जोडलेलं आहे. म्हणून याला बृहस्पती चक्र अशा नावानेही उत्तर भारतात ओळखले जाते.”

साठ वर्षांचे चक्र बृहस्पतिसंवत्सरचक्र या नावाने ओळखतात.  गुरुग्रहाशी याचा संबंध आहे. या साठ वर्षांचे तीन गट आहेत. पहिली वीस वर्षे ब्रह्मविंशति समजतात. त्यांची नावे धनधान्याच्या समृद्धीची निदर्शक आहेत. उदाहरणार्थ पहिले नाव प्रभव आहे तर दुसरे विभव आहे.  यांचे अर्थ विपुल उत्पादन व वैभव असे आहेत. पुढची वीस वर्षे विष्णुविंशति म्हणजे विष्णूची. यात संमिश्र फळे दर्शवणारी नावे आहेत. उदा. पुढचे संवत्सर शुभकृत् नावाचे आहे ते शुभसूचक आहे. पण एका संवत्सराचे नाव दुर्मुख  असेही आहे, जे वाणीची कटुता दर्शवते. अखेरची वीस वर्षे रुद्रविंशति म्हणजे शिवाची आहेत. यात हानी, क्षय यांचे प्राबल्य मानले आहे. एकंदरीत उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र यातून सुचवले असावे.” असे देखील त्यांनी सांगितले.

साठ वर्षांच्या एका चक्रानंतर ही नाव पुन्हा येतात. या संवत्सरांना संस्कृत नावं दिली गेली आहेत. उदा. प्रभव, विभव, आनंद, शार्वरी इत्यादी, हे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Exit mobile version