जगभरात दिवाळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील मुस्लिम महिलांनी प्रभू रामचंद्रांची आरती करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर प्रदेश येथील वाराणसीमध्ये विशाल भारत संस्थान आणि मुस्लिम महिला फाउंडेशन यांच्या माध्यमातून लमही येथील सुभाष भवन परिसरातील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
गेली १५ वर्ष विशाल भारत संस्थान आणि मुस्लिम महिला फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. यावेळी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेशही दिला गेला. या आरतीच्या आयोजनासाठी या महिलांना धमक्याही आल्या. पण या सर्व धमक्यांना न जुमानता मुस्लिम महिलांनी भगवान श्री रामाची महाआरती करून जातीयवादी शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी मुस्लिम महिलांनी श्री राम प्रार्थना आणि उर्दूमध्ये लिहिलेली श्री राम आरती गाऊन महाआरती केली. भारताच्या पवित्र भूमीवर राहणारे सर्व जण सांस्कृतिकदृष्ट्या एक असल्याचा संदेश देण्यासाठी मुस्लीम महिलांनी दीपप्रज्वलन आणि रोषणाई केली.
हे ही वाचा:
सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी
२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र
दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय उत्सव जाहीर
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
या आधी मुस्लीम महिलांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील पवित्र मातीचा कलश डोक्यावर ठेवून पूजास्थळी आणला. यानंतर मुस्लिम महिलांनी जय सियारामच्या घोषणा दिल्या आणि रामनामाचा जपही केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पातालपुरी मठाचे पीठाधीश्वर महंत बालकदास महाराज यांनी मुस्लिम महिलांसोबत श्रीराम आरती गाऊन धर्मातील भेद नाहीसा केला. ‘सबके राम, सब में राम’ असा संदेशही त्यांनी दिला.