मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राच्या लोक परंपरेचा ‘मल्हार महोत्सव २०२२’चे आयोजन केले असून याविषयी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील बहुजन समाज राज्यभर विखुरला असून ते खाद्यसंस्कृती, बोलीभाषा आणि परंपरा जपण्यासाठी संघर्ष करत आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. त्यामुळे या परंपरा जपण्यासाठी या मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे पडळकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अनेक परंपरा आहेत. पोतराज, वासुदेव, गोंधळी, लावणी, कडक लक्ष्मी, नंदी बैल आदी अनेक परंपरा आहेत. या परंपरा आपण जतन करायला हव्यात, असे ते म्हणाले. या महोत्सवात ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिले आहे अशांच्या मुलाखती होणार आहेत. राज्यातील अनेक परंपरा लोप पावत आहेत त्यामुळे या लोक कलावंतांना या महोत्सवाच्या माध्यमातून पाठबळ देणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘घटिया आजम खान रोड’ झाला ‘अशोक सिंघल मार्ग’

सोने तस्करी करणाऱ्या १८ महिला विमानतळावर ताब्यात

का आहे म्हशीची किंमत ८० लाख??? वाचा सविस्तर…

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

हा महोत्सव सण म्हणून साजरा व्हायला हवा. याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. बहुजनांना एकत्रित करणे गरजेचे असून जे आधी कोणीही केलेले नाही ते आम्ही करत आहोत, असे पडळकर म्हणाले. महाराष्ट्रात अनेक जातीधर्म, पेहराव, बोली भाषा, लोककला आहेत. आपण त्यातून मोठे झालो आहोत हे नव्या पिढीला कळायला हवे, असे पडळकर म्हणाले. जातपात, राजकारण, पक्ष विसरून या महोत्सवाला सर्वांनी यावे, असे आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

‘मल्हार महोत्सव २०२२’चे आयोजन पुण्यातील बालगंधर्व येथे १५- १६ जानेवारीला आयोजित करण्यात येणार आहे.

Exit mobile version