महाराष्ट्रात अनेक प्राचीन शिव मंदिर आहेत. या प्रत्येक शिव मंदिराचे आपलं स्वत:चं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. आपण आज ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते मुंबईजवळ ११ व्या शतकात बांधण्यात आलेलं प्राचीन शिव मंदिर. पांडव काळात बांधण्यात आलेलं हे शिव मंदिर एकाच रात्रीत बांधण्यात आले असे म्हटले जाते. अकराव्या शतकातही हे मंदिर आजही आपलं वैभव टिकवून आहे.
या मंदिराबद्दल जाणून घेण्याच्या आधी हे मंदिर ज्या शहरात आहे त्या अंबरनाथबद्दल जाणून घेऊया. अंबरनाथचा संबंध महाभारत काळापासूनचा आहे, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, पांडवांनी त्यांच्या वनवासातील काही कठीण वर्षे आज जिथे अंबरनाथ आहे, तिथे घालवली. कौरवांच्या सततच्या पाठलागामुळे पांडवांना या ठिकाणाहून पळ काढावा लागला होता. पांडवांच्याच काळात एका रात्रीमध्ये आणि एकाच दगडात हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिव मंदिर उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पांडवकालीन मंदिर अशी या मंदिराची दुसरी ओळख आहे. याच मंदिराचे दुसरे नाव अंबरेश्वर आहे. हे मंदिर पांडव वंशाचे असल्याचे स्थानिक लोक मानतात.
भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण असलेल्या या मंदिरात गाभाऱ्या पासून मुख्य सभामंडपापर्यंत जाणाऱ्या २० पायऱ्या आहेत, ज्यामध्ये मध्यभागी एक शिवलिंग आहे. मंदिरात अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत सुरेख कोरलेली आहे.
हे ही वाचा:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
आईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!
मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के
उस्मानाबाद आता झाले धाराशिव; औरंगाबादचा निर्णय मात्र विचाराधीन
या मंदिराबाहेर दोन नंदी आहेत. वालधुनी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर चिंच आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेले आहे. मंदिरामध्ये प्राचीन १९६० दशकातील प्राचीन शिलालेख आहे मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव असलेले हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबरनाथ येथे मोठी यात्रा भरते. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे.