महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित असा एक पवित्र सण असून याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. मोठ्या उत्साहात शिवरात्री भारतात साजरी केली जाते. या दिवशी भगवान महादेवाचे भक्त उपवास करतात, शंकराची पूजा करतात. विविध शिव मंदिरांना भेट देतात. देशभरात अनेक प्राचीन शिव मंदिरे असून यातील काही मंदिरांशी निगडीत अद्भुत अशा कथा आहेत. असेच एक मंदिर गुजरातमध्ये आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दिवसातून दोनदा काही वेळासाठी अदृश्य होते.
अदृश्य होणारे मंदिर म्हणजे गुजरातचे श्रीस्तंभेश्वर महादेव मंदिर. गुजरातमधील बडोदापासून ८५ किलोमीटर अंतरावर जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी- कंबोई गावात हे मंदिर आहे. निसर्गाचा विशेष आशीर्वाद लाभलेले हे मंदिर दिवसातून दोन वेळा समुद्रात लीन होते. थोड्या वेळाने ते पुन्हा दिसायला लागते. समुद्राच्या भरती आणि ओहोटीमुळे ही प्रक्रिया घडते. त्यामुळे समुद्रात ओहोटी असतानाच भाविकांना शिवलिंगाचे दर्शन घेता येते. भरतीच्या वेळी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते.
स्तंभेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या कळंबे किनाऱ्यावर वसलेले आहे. मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा आकार चार फूट उंच आणि दोन फूट व्यासाचा आहे. या प्राचीन मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे अप्रतिम दृश्य दिसते. जेव्हा समुद्रात भरती असते तेव्हा हे मंदिर पूर्णपणे समुद्रात बुडते. हे दिवसातून दोनदा घडते. पाण्याची पातळी खाली आल्यावर हे मंदिर पुन्हा दिसू लागते. श्रद्धेमुळे लोकांचा असा विश्वास आहे की, समुद्र दिवसातून दोनदा शिवलिंगाला अभिषेक करतो.
हे ही वाचा..
हिमाचल प्रदेश : महाशिवरात्री साजरी करण्यावरून मुस्लिमांनी हिंदूंवर गोळीबार केला
‘दिल्ली लुटली’, कॅगच्या अहवालानंतर भाजपचा ‘आप’वर निशाणा!
पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!
भारत- पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला केले ठार
पौराणिक कथेनुसार, तारकासुर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले. भगवान शिवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा तारकासुराने अमरत्वाचे वरदान मागितले पण भगवान शिव म्हणाले की, हे शक्य नाही. मग तारकासुराने असे वरदान मागितले की, त्याचा वध फक्त शिवाच्या मुलाकडूनच होऊ शकतो आणि त्या मुलाचे वय फक्त सहा दिवस असावे. भगवान शिवाने त्याला हे वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर तारकासुर अहंकारी झाला. त्याने देव आणि ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन सर्वजण भगवान शिवाकडे गेले आणि तारकासुरला मारण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि श्वेता पर्वतकड्यातूल सहा दिवसांचे बाळ कार्तिकेय जन्माला आले. कार्तिकेयाने तारकासुरचा वध केला पण जेव्हा त्याला कळले की तारकासुर हा शिवाचा भक्त होता, तेव्हा त्याला खूप दुःख झाले. कार्तिकेयाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने भगवान विष्णूंना प्रायश्चित्ताचा मार्ग विचारला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला ज्या ठिकाणी त्याने तारकासुरला मारले होते, तिथे शिवलिंग स्थापित करण्याचा सल्ला दिला. कार्तिकेयाने तेच केले. त्याने तिथे एक सुंदर शिवलिंग स्थापित केले. हे ठिकाण पुढे स्तंभेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.