तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

राजभवन, महाराष्ट्र असोसिएशनच्या कार्यक्रमात गाजली ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस दिमाखात साजरा झाला. चेन्नईतही या दिवसाचे औचित्य साधून एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सईशा फाऊंडेशन मुंबईच्या संपूर्ण चमूला तामिळनाडूतील चेन्नई स्थित महाराष्ट्र असोसिएशनच्या डॉ. देवाजी राव यांनी ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ सादर करण्याचे आमंत्रण दिले होते. चेन्नईतील मध्यवर्ती भारतीय विद्या भवन, मैलापूर येथील भव्य सभागृहात हा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या या उपक्रमाचे लेखक, गीतकार, संगीतकार अनिल नलावडे तसेच दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव यांना त्याच दिवशी तामिळनाडू राजभवनातूनही आमंत्रण होते. तामिळनाडू राजभवनात महाराष्ट्र व गुजरात स्थापना दिवसानिमित्त माननीय राज्यपाल थिरू आर. एन. रवी यांनी विविध संस्थांना, सन्माननीय मान्यवरांना आमंत्रित केले होते. १ मे या दिवसाचे महत्त्व, महाराष्ट्राची संस्कृती तसेच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचे ब्रीदवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ याचा सुंदर मिलाफ करीत अनिल नलावडे यांनी संगीत शिवस्वराज्य गाथा या उपक्रमातील महाराष्ट्र संस्कृतीवर स्वरचित असे महाराष्ट्रगीत माननीय राज्यपाल व उपस्थितांसमोर सादर केले, तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील कवीराज भूषण तिवारी यांनी रचलेल्या शिवबावनी मधील काही छंद पद्मश्री राव यांनी तडफदार शैलीत सादर केले.

 

 

राज्यपाल थिरू आर. एन. रवी यांनी दोन्ही कलाकारांचे कौतुक आपल्या भाषणात केले. महाराष्ट्र दिनानिमित महाराष्ट्रात सोहळे साजरे होत असताना दूर तामिळनाडूच्या थेट राज्यपाल भवनात महाराष्ट्र संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासाचे गोडवे अभिमानाने गायले गेले हे विशेष होते. या दोन्ही कलाकारांची राज्यपालांनी घेतलेली नोंद तसेच त्यांनी सादर केलेले गीत व छंद प्रेस नोडल एजेंसी यांनी ट्विटर वर प्रसारित केले.

छत्रपतींचा इतिहास आणि महाराष्ट्र मातीचा पराक्रम असाच जगभर पोहोचावा याचसाठी सईशा फाऊंडेशन मुंबई सदैव कार्यरत आहे. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इतर राज्यांमध्येही महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस साजरा व्हावा असे आवाहन केंद्र सरकार कडून करण्यात आले.

‘महाराष्ट्र राज्य राहिला काही, तुम्हा कारणे’ हे समर्थांचे सार्थ बोल ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिव्य स्वप्नांमुळेच आजही अबाधित राहिले.. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढील पिढ्यानपिढ्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी किंबहुना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, थोर पराक्रम केला..

हे ही वाचा:

पुतिन यांच्या पाठोपाठ या समर्थकावर प्राणघातक हल्ला, चालकाचा मृत्यू

काँगोमध्ये पुराचा हाहाकार , २०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती अनेक

पोलिस उपायुक्ताच्या मुलाची हत्या मामेभावाने मालमत्तेसाठी केली!

दिवे गेलेले असताना राष्ट्रपतींवर प्रकाशझोत ठेवणे धोक्याचे होते! असे काय घडले?

या मराठभूमीचा सुवर्ण आणि प्रेरणादायी इतिहास, त्याची गौरवगाथा संगीताच्या माध्यमातून मांडून, दृक्श्राव्य पद्धतीने, महाराष्ट्राची लोककला, परंपरा, संस्कृती, शिवशाहीचा जाज्वल्य इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालत सईशा फाऊंडेशन मुंबई गेली १५ वर्ष कार्यरत आहे. अनिल नलावडे यांच्या सक्षम लेखणीतून आणि प्रतिभाशाली काव्यातून शिवचरित्रावर ४२ नवगीते रचली गेली आणि त्याचेच भव्यदिव्य असे सादरीकरण ते व त्यांची टीम ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या सांगीतिक उपक्रमातून  सादर करीत असतात.

मराठी सोबतच इंग्रजी व तंजावूर मराठीत पद्मश्री राव यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले. आलेल्या तमाम मराठी रसिक श्रोत्यांसाहित तंजावूर मराठी, तामिळ भाषिक श्रोत्यांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

Exit mobile version