महाकुंभ मेळा: १० देशांची २१ सदस्यीय टीम त्रिवेणी संगमात करणार स्नान

परदेशी पाहुणे हेलिकॉप्टरमधून करणार महाकुंभाचे हवाई दर्शन

महाकुंभ मेळा: १० देशांची २१ सदस्यीय टीम त्रिवेणी संगमात करणार स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भव्य दिव्य असा महाकुंभ मेळावा भरला असून यासाठी करोडोंच्या संख्येने भाविक जमले आहेत. महाकुंभ मेळा हा आता केवळ भारतापुरता विषय राहिलेला नसून जगभरात या मेळ्याबद्दल उत्सुकता लोकांना असलेली दिसून येत आहे. विदेशी नागरिकांनीही या मेळाव्या सहभाग घेण्यासाठी भारत गाठल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून भारताचे आणि महाकुंभ मेळ्याचे कौतुक केले जात आहे. त्यांना याचे जबरदस्त आकर्षण असून स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल या दीक्षा घेऊन आता ‘कमला’ झाल्या आहेत. अशा अनेक विदेशी पाहुण्यांनी त्रिवेणी संगम येथे स्नान घेऊन महाकुंभ मेळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अशातच दहा देशांचे शिष्टमंडळ गुरुवार, १६ जानेवारी रोजी त्रिवेणी संगमात डुबकी मारण्यासाठी म्हणून सहभागी होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने या विदेशी पाहुण्यांसाठी खास व्यवस्था केली आहे. १० देशांची २१ सदस्यीय टीम प्रयागराजला महाकुंभ मेळाव्याच्या पवित्रतेची अनुभती घेण्यासाठी पोहोचले आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या एका विभागाकडून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकार दहा देशांतील या २१ पाहुण्यांचे यजमान बनले असून आदरातिथ्य केले जाणार आहे.

हे ही वाचा:

अदानींवर आरोप करणाऱ्या हिंडेंनबर्गला टाळे!

संभल वीजचोरी: खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी, दोन मदरशांसह १,४०० एफआयआरची नोंद

घरात शिरलेल्या चोराने अभिनेता सैफ अली खानवर केला चाकू हल्ला

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!

प्रयागराज येथे पोहोचल्यानंतर परदेशी पाहुण्यांचे बुधवरी हिंदू पद्धतीने टिळक लावून स्वागत करण्यात आले. यानंतर आरती झाली आणि त्यांना सायंकाळी प्रयागराज पाहण्यासाठी हेरिटेज वॉकवर नेण्यात आले. या पदयात्रेच्या माध्यमातून प्रयागराजच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची सर्वांना ओळख करून देण्यात आली. यानंतर गुरुवारी त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर या परदेशी पाहुण्यांना हेलिकॉप्टरमधून महाकुंभाचे हवाई दर्शन दिले जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय संघात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

Exit mobile version