दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेला असताना देशभरासह जगभरातील भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यासाठी येत असतात. कुंभमेळा जानेवारी महिन्यात प्रयागराजला होणार आहे. भाविकांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक, पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) घेतला आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडनकडून भाविकांच्या सुविधेसाठी ‘महाकुंभ ग्राम’ नावाचे एक लक्झरी टेंट सिटी उभारणार आहे. या टेंट सिटीमध्ये ४०० टेंट असतील आणि यात एक हजार भाविकांची राहण्याची सोय होऊ शकणार आहे. याशिवाय देशभरातील भाविक प्रयागराजला सुखरूप पोहचावेत यासाठी काही विशेष रेल्वे गाड्याही सोडण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वे १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान कुंभमेळ्यासाठी देशभरातून ९९२ विशेष गाड्या चालविणार आहे. त्याशिवाय आयआरसीटीसीतर्फे देशभरात १३ ‘भारत गौरव ट्रेन’ चालवण्यात येणार आहेत. यापैकी चार गौरव ट्रेन आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागातर्फे चालविण्यात येणार असल्याची माहिती आरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक गौरव झा यांनी दिली आहे.
हे ही वाचा..
शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार
पुतीन यांना ‘मेक इन इंडिया’ची भुरळ!
पश्चिम बंगालमधून २२७७ कंपन्यांनी केले स्थलांतर
संभल हिंसाचार : ३३ आरोपींची तुरुंगात रवानगी
आयआरसीटीसी पुण्याहूनही दोन ‘भारत गौरव ट्रेन’ चालवणार आहे. कुंभमेळ्यासाठी आयआरसीटीसीतर्फे पुण्याहून १५ जानेवारी आणि ५ फेब्रुवारी रोजी ‘भारत गौरव ट्रेन’ चालवली जाईल. याशिवाय विमान आणि रेल टुर पॅकेजची देखील सोय उपलब्ध करुन दिली आहे. राजकोट आणि इन्दौर येथून प्रत्येकी एक- एक भारत गौरव ट्रेन चालविण्यात येणार आहे. भाविकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन टेंट आरक्षित करता येणार असून लक्झरी तंबूसह विविध निवास पर्याय याबाबतची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.