अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन हा सण येऊन ठेपलाय. बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकर्षक डिझाइनच्या राख्या आल्या आहेत. खास रक्षाबंधन सणासाठी रंगबिरंगी, विविध कलाकुसर केलेल्या आकर्षक राख्यांनी बाजार फुलला आहे.
दरवर्षी रक्षाबंधनला बाजारात नवनवीन प्रकारच्या राख्या येत असतात. यंदाही बाजारपेठांमध्ये फॅन्सी राख्यांसह पारंपरिक राख्या खरेदीकडे कल दिसून येत आहे. तर, लहान मुलांमध्ये छोटा भीम राखी आजही अग्रस्थानी आहे. मोटू पतलू, स्पायडर मॅन, किड्स टॉय, डोरेमॉन यासारख्या अनेक राख्या मुलांच्या दिमतीला आहेच. राख्यांमध्ये लाइट, संगीताची धून तसेच, आतून कॅमेरा अशा काही हटके राख्याही पाहायला मिळत आहेत.
केवळ इतकेच नाही तर महिलांसाठी सुद्धा राखी आता इन ट्रेंड आहे. चुडी राखी म्हणजे एखाद्या बांगडी किंवा कड्याप्रमाणे असते. या राख्यांची डिझाइन वेगळी असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये मोती व जरीच्या राख्यांची मागणी सर्वाधिक आहे. स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड, बीड्स राख्या अधिक लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांमध्ये कार्टुनच्या राख्यांना अधिक मागणी आहे. या राख्या अगदी १५ रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंतही आहेत.
हे ही वाचा:
मुंबई क्रिकेट असोसिएशन अपेक्स कौन्सिलच्या सदस्यांनी उठविला आवाज
आरटीओ विभागातही ‘रहदारी’ची कोंडी
उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करा
अशीही एक सामाजिक संदेश देणारी राखी
पालघर येथील विवेक डेवलपर सामाजिक संस्थेने यंदाही राख्या बनवल्या आहेत. यांतील महिलांनी बाबूंच्या राख्या बनविल्या आहेत. या राख्यांचे वैशिष्टय म्हणजे या राख्यांना नर्मदा, कावेरी, गोदावरी अशी भारतातील नद्यांची नावे दिलेली आहेत. आदिवासी महिलांनी या बांबूच्या राख्या बनवलेल्या आहेत. लाकडी फळी, नैसर्गिक रंग वापरून बनवलेल्या या राख्या देखण्या तर आहेच, पण पर्यावरणपूरक देखील आहेत. भारत सरकार वस्त्र मंत्रालयामार्फतही या संस्थेतील महिलांना सक्षम बनविण्यासाठी मदत केली जाते.