भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेला झाला आणि त्यामुळेच श्रीकृष्णजन्माष्टमीला तिथे प्रचंड मोठा उत्सव साजरा केला जातो. पण श्रीकृष्णाचा जन्म खरे तर झाला असता शौरीपूर किंवा तत्कालिन शौर्यपूरमध्ये. शौर्यपूर हे श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांचे राज्य. पण आज उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यातील ते शौर्यपूर किंवा शौरीपूर सुनसान आहे. काय आहे त्यामागील कारण.
यमुना नदीजवळ बटेश्वरधाम हे ठिकाण आहे तिथून तीन किलोमीटरवर शौरीपूर हे गाव आहे. हाच भाग कधीकाळी श्रीकृष्णाच्या पूर्वजांची राजधानी होती. पण आता तिथे मात्र मथुरेप्रमाणे श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा होत नाही. महाभारताच्या काळात शौरीपूर हे मोठे शहर होते. राजा शूरसेन याने हे शहर वसविले. आज तिथे त्याचा कोणताही अंश शिल्लक नाही. शूरसेन यांचा मुलगा अंधक वृष्णि याला वसुदेव आणि समुद्र विजय असे दहा मुलगे तर कुंती आणि माद्री या मुली होत्या. कुंती आणि माद्री या कुरूवंशी पण्डुच्या पत्नी होत्या. कुंतीचे पुत्र म्हणजे पांडव. त्यातील वसुदेव यांचा विवाह मथुरेतील राजा कंसाची बहीण देवकी यांच्याशी झाला. वसुदेव यांची वरात मथुरेला गेली आणि तिथे हा विवाह संपन्न झाला. मात्र त्याचवेळी आकाशवाणी झाली आणि वसुदेव-देवकी यांचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल हे स्पष्ट झाले. कंसाने तात्काळ वासुदेव-देवकी यांना कोठडीत डांबले. तिथेच श्रीकृष्णाचा जन्म झाला. जर विवाहानंतर वसुदेव आपल्या शौर्यपूर या शहरी आले असते तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म तिथे होऊ शकला असता.
हे ही वाचा:
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात
लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा
समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज
वसुदेव यांचे बंधू समुद्र विजय आणि त्यांची पत्नी शिवा यांच्या पोटी नेमिनाथ हा सुपुत्र जन्माला आला. नेमिनाथचा विवाह जुनागढ (सौराष्ट्र) मधील राजे उग्रसेन यांच्या कन्येशी होणार होता. त्यासाठी श्रीकृष्णाचे चुलत भाऊ नेमिनाथ हे वरात घेऊन जुनागढला गेले. पण तिथे वऱ्हाड्यांसाठी मांसाहाराची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी जनावरे आणली गेली आहेत, असे कळल्यावर नेमिनाथ यांनी मुंडावळ्या सोडून गिरनार पर्वतावर निघून गेले. तिथे दीक्षा घेऊन ते दिगंबर साधू बनले. ते जैन धर्माचे २२वे तिर्थंकर आहेत. त्यामुळे हे आजचे शौरीपूर जैन धर्माचे आस्था केंद्रही आहे, असे म्हटले जाते.