अयोध्येत २२ जानेवारी रोजी ‘न भूतो न भविष्यति’ असा राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशासह संपूर्ण जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. देशभरातून अनेक भेटवस्तू अयोध्येला रवाना करण्यात येत आहेत. अशातच गुजरातच्या वडोदरा येथून प्रभू श्री राम मंदिरासाठी विशेष अगरबत्ती पाठविण्यात येणार आहे. अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार आहे.
गुजरातच्या वडोदरा येथून अयोध्येला एक विशेष अगरबत्ती पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही अगरबत्ती तब्बल १०८ फूट लांबीची आहे. ही अगरबत्ती तयार झाली असून लवकरच अयोध्येसाठी रवाना होणार आहे. या अगरबत्तीचे वजन ३ हजार ५०० किलो इतके आहे. या अगरबत्तीची किंमत पाच लाखांच्या वर असून ती तयार करण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. ही अगरबत्ती ११० फूट लांबीच्या रथातून वडोदराहून अयोध्येला पाठवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही अगरबत्ती एकदा पेटवली की दीड महिना सतत जळत राहून वातावरण सुगंधित करत राहते.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्री रामाच्या नव्याने बांधलेल्या मंदिराचा अभिषेक केला जाणार आहे. याबाबतची तयारी रामनगरीत जोरदार सुरू आहे. देशभरातून अनेक साधू, संतांना आणि मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. सोहळ्यानंतर लगेचच सामान्य भाविकांसाठीही मंदिर खुले होणार आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या अभिषेकानंतर रामाच्या पादुकाही तिथे ठेवण्यात येणार आहेत. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी १९ जानेवारीला पादुका अयोध्येत पोहोचतील. हैदराबादमधील श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका तयार केल्या आहेत. १ किलो सोनं आणि ७ किलो चांदीचा वापर करत पादुका तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय या पादुका तयार करताना बहुमुल्य अशा रत्नांचा त्यात वापर करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!
स्थलांतर प्रश्नाच्या तोडग्यासाठी युरोपियन युनियनच्या ‘स्थलांतर धोरणा’त दुरुस्तीसाठी करार
सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं
संसद सुरक्षा भंग प्रकरणी आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात, माजी पोलीस उपअधीक्षकाच्या मुलाचा समावेश!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी २ हजार ५०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ४ हजार साधु संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर, २३ जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे. या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये प्राणांची आहुती दिलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. २३ जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.