उत्तरप्रदेशमधील अयोध्येत भव्य अशा राम मंदिराचे निर्माणकार्य जोरात सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा देशभरात साजरा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व नागरिकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
२२ जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार असून मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी. मंदिर आणि महत्त्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मुंबईतील १० ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा:
गोव्यात काँग्रेस, ‘आप’ला सनातन धर्माची चिंता!
विनेश फोगटने अर्जुन, खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर सोडले!
इंडिया गटातील काँग्रेसच्या जागावाटपाच्या योजनेला तीन राज्यांत अडथळा!
महत्त्वाच्या ‘सर्वोच्च’ निकालांचे ठरले २०२३ हे वर्ष
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवार, ३० डिसेंबर रोजी अयोध्येतून जनतेशी संवाद साधताना सांगितले की, “२२ जानेवारीला अयोध्येत न येता सर्व देशवासीयांनी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करा.” २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साह आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचत आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि गेस्ट हाऊस आधीच फुल्ल झाली आहेत. रेल्वे आणि बसची तिकिटेही बुक झाली आहेत. गर्दी पाहता प्रशासनाकडूनही लोकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यानंतर आता पंतप्रधान मोदींनीही जनतेला आवाहन केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनतेला आवाहन करत आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.