देऊळ बंद…कुंकू रुसलं!

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

करमाळा तालुक्‍यातील केम येथे तयार होणारे कुंकू हे अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे. खास या कुंकवाची तयार करण्याची पद्धत अतिशय वेगळी असल्याने या कुंकवाला देशभरातून मागणी असते. परंतु गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आणि निर्बंध लक्षात घेता या धंद्यावर विपरीत परीणाम झालेला आहे. देऊळ बंद असल्यामुळे कुंकू खरेदी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. केम येथील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदी, कुंकू तयार करण्यात येते. त्यामुळे या मजूरांनाही आता घरी बसावे लागलेले आहे. विशेषतः हळकुंडांपासून तयार केलेल्या कुंकवाला सर्वांत जास्त मागणी आहे म्हणूनच केम हे कुंकवासाठी प्रसिद्ध झालेले आहे.

केममधील कुंकवाच्या व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय आहे. या कुंकवाचा इतिहास हा जवळपास १०० वर्षांपूर्वीचा आहे. केम गावाच्या भोवताली अनेक कारखाने असून, या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाला वर्षभर तर मागणी असते.पण कोरोनामुळे मात्र आर्थिक गणित चांगलेच बदलून गेले आहे. सध्या सण समारंभावरही निर्बंध असल्यामुळे कुंकू खरेदी करण्यात येत नाहीये. तसेच होणारी लक्षणीय निर्यातही थांबलेली आहे. त्यामुळे ४०० कामगारांवर बेकार होण्याची वेळ आलेली आहे.

सध्याच्या घडीला गाव खेड्यातील यात्राही बंद झाल्या आहेत. त्यामुळे हा कुंकवाचा धंदा फिका पडलेला आहे. केम येथे जवळपास कुंकू बनविण्याचे २२ कारखाने आहेत. यात्रांमध्ये केम येथील कुंकवाला मोठी मागणी असते. परंतु याही वर्षी कोणत्याच यात्रा झालेल्या नाहीत. त्यामुळेच हा कुंकवाचा व्यवसाय चांगलाच संकटात सापडलेला आहे.

हे ही वाचा:

आता श्वानपथक लागणार दारूच्या मागे!

आधी मराठी शाळा तर वाचवा, मग ‘केंब्रिज’कडे वळा!

राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…

महाराष्ट्र, कोल्हापूरचे संघ उपांत्य फेरीत; कोल्हापूरच्या मुलांचा संघ पराभूत

सणा सुदीच्या काळात इथल्या मजुरांच्या हाताला मिळणारे कामच आता बंद झालेले आहे. उजनी जलाशयाच्या निळ्याशार पट्ट्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलेल्या केम या गावामध्ये हिरवीगार शेती आहेच. परंतु केमच्या अवतीभोवती वाळत असलेले हळदी-कुंकवाचे वाळवण सध्या दिसत नाहीये.

Exit mobile version