कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जात असाल तर आता तुम्हाला मास्क लावावा लागणार आहे. चीन आणि इतर देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या बीएफ.७ या नव्या व्हेरिएंटमुळे हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवार २३ डिसेंबर २०२२ पासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आलेली असली तरी परंतु भाविकांना अद्याप करण्यात आलेली नाही, असे मंदिर समितीने म्हटलं आहे. या मंदिरात १७५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून आता मंदिरात मास्क वापरावे लागणार आहे.
कोल्हापूरबरोबरच मुंबईतील मुंबादेवी प्रशासनानेही याच पावलावर पाऊल टाकले आहे. मुंबादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी मास्क लावावा, असं आवाहन मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दर्शनाला येताना मास्क लावणे सक्तीचे नाही, परंतु कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत असल्याने येणाऱ्या भक्तांनी काळजी घ्यावी यासाठी हे आवाहन करण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात
मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!
सध्या राज्यात दररोज सरासरी १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. या सर्वांची जीनोम चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचे नमुने पुणे आणि मुंबईतील प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील. महाराष्ट्र सरकार कोरोनावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करत आहे. त्यांच्या सूचनेनंतर विमानतळ, बस आणि रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे