‘लडकी चीज ही ऐसी है…’ अजमेर दर्ग्याचे सरवार चिश्ती यांनी गुण उधळले

अजमेर ९२ चित्रपटाच्या निमित्ताने महिलांना दुय्यम समजणारे केले वक्तव्य

‘लडकी चीज ही ऐसी है…’ अजमेर दर्ग्याचे सरवार चिश्ती यांनी गुण उधळले

१९९२ मधील अजमेर शरिफ बलात्कार प्रकरणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणारे वादग्रस्त वक्तव्य अजमेर शरिफ दर्ग्याचे सय्यद सरवर चिश्ती यांनी केले आहे. ‘मुलगी अशी वस्तू आहे की, ती पुरुषाला भ्रष्ट करते,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. १९९२मधील अजमेर शरिफ बलात्कार प्रकरणावर ‘अजमेर ९२’ हा चित्रपट येत आहे. त्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारल्यावर असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

 

‘पुरुष कदाचित पैशांमुळे भ्रष्ट होणार नाही, कदाचित नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होणार नाही. मात्र मुलगी अशी वस्तू आहे की, ती सर्वांना भ्रष्ट करते. जसे की मनेकाने विश्वामित्रांची तपश्चर्या भंग केली. सर्व बाबा मुलींशी संबंधित प्रकरणांमध्येच तुरुंगाची हवा खात आहेत. सर्वांत प्रभावशाली व्यक्तीही या जाळ्यात अडकल्या आहेत,’ असे सरवार चिश्ती म्हणाले.

 

चिश्तींच्या या वक्तव्यावर अजमेरचे उपमहापौर नीरज जैन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॅमेऱ्यामागे सरवार चिश्ती यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने त्यांच्या मनोवृत्तीचाच पर्दाफाश केला आहे. त्यांचा महिलांकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोनच यातून प्रतीत होतो. तुम्ही तुमच्या आई आणि बहिणीबाबत कसे विचार करता, हेच यातून दिसून येते. ते या चित्रपटाला जातीय रंग देऊन आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, ’ असा आरोप त्यांनी केला आहे.

 

अजमेर दर्गा बलात्कार प्रकरणात अजमेर दर्ग्याच्या केअरटेकरनी सुमारे २५० मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तसेच, त्यांना धमक्याही दिल्या जात होत्या. या बलात्कार प्रकरणात अजमेर दर्ग्याचे चिश्ती खादिम (केअरटेकर) आरोपी आहेत. परिसरातील अनेक प्रभावशाली व्यक्ती या प्रकरणात आरोपी होते. ‘अजमेर ९२’ या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे वादाचे मोहोळ उठले आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली असून तो १४ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!

मँचेस्टर सिटी पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगचे विजेते

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

‘लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे कार्याध्यक्षपदी’

या प्रकरणासंदर्भात वकील अजय प्रताप यांनी अधिक माहिती दिली. ‘या प्रकरणात अनेक कुटुंबे भरडली गेली. अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सुटले. त्यांची नावे शाळेतून काढण्यात आली. अनेक जण अजमेरमधूनच बाहेर पडले. काही मुलींची नावे उघड झाल्याने त्यांच्यावर त्यांची नावे बदलण्याची वेळ आली. त्यांच्या मुलींच्या लग्नात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी वकील, पत्रकार आणि पोलिसांना त्यांच्या मुलींची नावे उघड होऊ नयेत, अशा विनवण्या केल्या. सन १९९२ ते १९९६ काळात अनेक मुलींची लग्न होण्यात अडचणी आल्या. अजमेरमधील मुलींना लग्न होण्यासाठी हे शहर सोडण्याची वेळ आली,’ अशी माहिती त्यांनी दिली.

 

सरवार चिश्ती याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वादात अडकले आहेत. त्यांनी सन २०२२ मध्ये हिंदूंवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी रॅली काढली होती. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले होते.

Exit mobile version