संघभगीरथाचे संजीवक संस्मरण

संघभगीरथाचे संजीवक संस्मरण

आज वर्षप्रतिपदा. युगादी, उगादी, चेतिचंद, गुढी पाडवा… कितीतरी नावे. देशभर विविध प्रांतात विविध पद्धतीने साजरा होत असलेला हिंदू नव वर्षारंभाचा सण.

आता पारंपरिक पद्धतींबरोबरच एक नवी रीत सर्वत्र चांगलीच रुढावलेली दिसते. आपापल्या घरांवर गुढी उभारून परंपरेचं पालन करून समाजातील आबालवृद्ध स्त्रीपुरुष एकत्र येत भगव्या ध्वजाची सार्वजनिक गुढी नाचवत हिंदू नववर्षाच्या स्वागतयात्रेत उत्साहाने सहभागी होताना दिसतो. हे करताना पारंपरिक वेष धारण करतो. मंगल वेष परिधान करतो. लहान गावांमधील स्वागतयात्रेत एकच विशाल कुटुंब चालताना दिसावे असे चित्र असते. तर मोठ्या शहरांत, महानगरांत हे चित्र वैविध्याने विराटाचे दर्शन घडवते. प्रांतोप्रांतीचे वेष, सुदीर्घ परंपरेतील स्मृतिचित्रांनी आणि आज-उद्याच्या आकांक्षाच्या संकल्पचित्रांनी सजलेले चित्ररथ, समूहासमूहातून म्हटल्या जाणाऱ्या प्रेरणागीतांचे मंगल गुंजन, चौकाचौकात घातलेले रांगोळ्यांचे सडे, तिथे स्वागतयात्रेतून होणारे लेझीम, फुगडया आदी विविध खेळांचे, दंड-खड्ग आदी शस्त्रसंचालनांची वीरोचित प्रत्यक्षिके अशी रूपवैविध्याची समृद्धी घेऊन यात्रा पुढे पुढे सरकत जाताना दिसते. कुणा एकाच्या निर्देशाने, नेतृत्वात नव्हे तर एका आंतरिक सामंजस्याने, सहमतीने ही यात्रा सगुण साकार होते, सजीव होते. जणू ‘संगच्छद्वं संवदत्वम्… सहचित्तमेषाम्’ या वेदमंत्राचे ते जिवंत दर्शन असते.

या यात्रेत सहभागी झालेले कोण असतात? काय असते त्यांची ओळख? काय असतो परिचय? प्रांत, भाषा, व्यवसाय, जात, कुल सारं सारं मागे टाकून तो एक दिशेने पुढे जाणारा सारा समुदाय स्वतःची एकच ओळख सांगत असतो… “होय! आम्ही हिंदू आहोत!”

आज आपल्या एकात्म, एकरस हिंदू समाजाचं हे चैतन्यचित्र पाहताना शंभर वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाचे स्मरण होते. विदर्भातील एका मोठ्या नगरातील सुविद्य प्रतिष्ठितांची एक सभा सुरु होती. स्वाभाविकपणे काही प्रासंगिक सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा सुरु होती. सभेत चर्चेच्या अनुषंगाने ‘आपले हे हिंदुराष्ट्र’ असा उल्लेख येताच एका महाभागाने खिजविणाऱ्या शब्दांत ‘कोण महामूर्ख म्हणतो की हे हिंदुराष्ट्र आहे ?’ अशी विचारणा करताच त्या सभेत तत्क्षणी ‘होय! मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो हे हिंदुराष्ट्र आहे !’ अशी नि:संदिग्ध गर्जना निनादली होती.

आज स्वतःला हिंदू असे अभिमानाने म्हणविणारा, आपल्या राष्ट्राची आत्मविश्वासाने हिंदुराष्ट्र अशी ओळख गर्जून सांगणारा, मिरविणारा समुदाय हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत बघताना कोण होते हे डॉ. हेडगेवार ? इतक्या निश्चयी स्वरात हिंदुराष्ट्राचा घोष करण्यामागे त्यांच्या प्रेरणा कोणत्या होत्या? हे जाणून घेणे औचित्याचे होईल.

ऐन इंग्रजी राजवटीत १८८९ या ख्रिस्ती वर्षात वर्ष प्रतिपदेला म्हणजे आजच्याच तिथीला जन्मलेल्या डॉ. हेडगेवारांच्या विद्यार्थीजीवनापासूनच त्यांच्या राष्ट्रसमर्पित जीवनाच्या खुणा लख्खपणे दिसून येतात. इंग्रजी सत्ताधीशांच्या राज्यारोहण उत्सावानिमित्त वाटलेली मिठाई फेकून देणे अथवा सीताबर्डीच्या किल्ल्यावरील इंग्रजांचे निशाण उचकटून काढण्यासाठी केलेला खंदक खुदाईचा प्रयत्न हे दोन्ही प्रसंग त्यांच्या शालेय जीवनातील प्रखर देशभक्तीचेच आविष्कार आहेत. वंगभंगानंतर देशभर उसळलेल्या उद्रेकात विद्यार्थी सहभागही लक्षणीय होता. तेव्हा विद्यार्थी असलेल्या बाल केशवानेही शाळा तपासणीला आलेल्या अधिकाऱ्याला ‘वंदे मातरम्’ च्या सामूहिक उद्घोषाने करण्याची योजना आखण्यात केलेले नेतृत्व असाधारण संघटनकुशलतेचेच उदाहरण मानायला हवे.

या अभियानातील सहभागाचे शासन म्हणून शाळेतून झालेली हकालपट्टी हे “बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे!” या उक्तीचा प्रत्यय देणारेच होते. तरीही न डगमगता राष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण करून कोलकत्त्यात जाणे केवळ पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी नव्हते तर सेवेपासून सशस्त्र क्रांती, सामाजिक आंदोलने आदीच्याही शिक्षणासाठी होते हे तिथे दामोदर नदीच्या पूरग्रस्तांसाठी केलेले मदतकार्य, अनुशीलन समितीतील सहभाग, पदवीच्या मान्यतेसाठी केलेलं विद्यार्थी आंदोलन अशा विविध चळवळींतील सक्रिय सहभागाने स्पष्टच होते.

पदवीसंपादनांनंतर नागपुरात परतलेल्या डॉ. हेडगेवारांनी स्वतःचा दवाखाना न काढता विदर्भातील सर्वच प्रकारच्या सामाजिक, राजकीय चळवळीत लक्ष घातले, केवळ सहभाग नाही तर नेतृत्व केले. मंडालेत सहा वर्षांचा सश्रम कारवास भोगून परतलेल्या लोकमान्यांनी समाजमनात चैतन्य फुलविले होते. राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हे तर राष्ट्रभाक्तीचे व्यासपीठ, विद्यापीठ झाले होते. डॉ. हेडगेवारांनी नागपूरच्या काँग्रेसचे नेतृत्व केले, १९२० मध्ये नागपूरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात मोलाची भूमिकाही बजावली होती. दुर्दैवाने तत्पूर्वीच लोकमान्यांचे निर्वाण झाल्याने अरविंदबाबू घोष यांनी पुन्हा नेतृत्व करावे यासाठी डॉ. हेडगेवार त्यांच्या भेटीलाही गेले होते.

हे ही वाचा:

अखिलेशचे काका शिवपाल भाजपाच्या वाटेवर?

अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा सुरू करा!

‘या’ कारणामुळे इन्फोसिस रशियातील सर्व कार्यालये बंद करणार?

 

हे सर्व करताना त्यांचे आत्मविस्मृतीमुळे पारतंत्र्यातही स्थैर्य, स्वार्थ, उपभोग यांची चटक लागलेला हिंदू समाज,    उत्कर्षासाठी नेतृत्वाची वाट पाहणारे समाजमन, विस्कळीत समाजस्थिती असे संभ्रांत भोवताल पाहणाऱ्या डॉक्टरांना आपल्या समाजाच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या उत्कर्ष-अपकर्षाच्या चक्रीय क्रमाला थोपविण्याची आवश्यकता जाणवत होती. काळाच्या टप्प्याटप्प्यांवर समृद्ध सशक्त परंपरा असलेल्या या देशाला, समाजाला पुनःपुन्हा पारतंत्र्याला सामोरे जावे लागत होते. वर्तमान चळवळी आणि आंदोलनांत पूर्ण सक्रिय असतानाच डॉक्टरजी या दु:स्थितीवर मात करण्यासाठी मार्गाचा शोध घेत होते. ती एक चिंतनसाधनाच होती. सर्व चळवळी आणि आंदोलनांत त्यांत सहभागी व्यक्ती आणि ज्यासाठी करायचे तो व्यक्तींनी बनलेला समाज हे दोन्ही प्रधान घटक असतात. व्यक्तीव्यक्तींनी समाज बनतो. त्या व्यक्तीजीवनाचीच घडण समर्थ, संघटित समाजनिर्मितीसाठी केली तर समाजात नित्य निरंतर जागृती राहील. त्या जागृतीचे सातत्य राहील. त्यासाठी व्यक्ती आणि समाज यांच्यातील स्वाभाविक परस्परपूरकतेचे भान जागवायला हवे.

डॉक्टर हेडगेवारांच्या या साधनाचिंतनाचे फळ म्हणजेच संघशाखा. व्यक्तीजीवनाला सामूहिकतेतून संस्कारित करणारी साधना भूमी. ख्रिस्ती वर्ष १९२५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी प्रत्यक्ष प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा संघशाखा, आयाम, गतिविधी, विविध क्षेत्र अशा अनेक अंगांनी विकास झाला, विस्तार झाला. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या  विचारत्रिपदीवर दृढ असलेल्या आणि आता शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संघाच्या कामात, दृश्यरूपात अनेक परिवर्तने झाली.  परिणामत: समाजाचा प्रतिसादही बदलला. अधिकाधिक स्वीकाराचा, सहयोगाचा झाला. हिंदू या शब्दाला मिळणारा प्रतिसादही अधिक सकारात्मक, सन्मानपूर्ण असतो. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक उदाहरणे सर्वांसमोरच आहेत. वानगीदाखल वैचारिक क्षेत्रातील एक लक्षणीय उदाहरण द्यावेसे वाटते. दक्षिण भारतात वैचारिक जगतात दबदबा असलेले लेखक कांचा इलाया यांच्या १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका ग्रंथाचे नाव होते ‘व्हाय आय ऍम नॉट हिंदू?’. दक्षिणेतील आणखी एक राजकीय विचारवंत, लेखक शशी थरूर यांचे २०१८ मध्ये पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे शीर्षक आहे ‘ व्हाय आय ऍम ए हिंदू?’

शंभरेक वर्षांपूर्वी तत्कालीन ढुढ्ढाचार्यांच्या एका सभेचे स्मरण करून द्यावेसे वाटते. काही राजकीय चर्चा सुरु असताना चर्चेतील विषयाच्या अनुषंगाने आपल्या समाजाचा हिंदू असा उल्लेख होताच तिथे उपस्थित असलेले एक प्रतिष्ठित महानुभाव उठले होते आणि आवेशाने म्हणाले होते, “एकवेळ मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका!”

शंभर वर्षे सरून गेल्यावर हिंदू या शब्दाविषयीच्या नकारातील विखार, अंगार काहीसा शमलेला, पराभूत झालेला दिसतो या परिवर्तनात संघाच्या परिश्रमी अविचल वाटचालीची परिणामकारक भूमिका आहे हे नि:संशय. संघकार्याचे असे थेट सकारात्मक परिणाम सहज दृष्टीस पडतात. सुदूर पुर्वांचलातील काम, स्वामी विवेकानंद राष्ट्रीय स्मारक निर्माण, वनवासी प्रदेशातील एकल विद्यालये, देशभर सर्वत्र चाललेले दिड लाखांहून अधिक विविध प्रकारचे  सेवा प्रकल्प, विविध प्रकल्पांना समाजाकडून मिळणारे उदंड आर्थिक सहकार्य अशा विविध दृष्टीकोणातून संघविचाराच्या वाढत्या स्वीकाराचे सुभग दर्शन घडते आहे.

अशा टप्प्यावर हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतील सहभागी एकरस हिंदू समाजाचे चैतन्यपूर्ण दर्शन हेच संघगंगेच्या भगीरथाचे  आज त्याच्या जन्मदिनी होणारे संजीवक संस्मरण आहे.

 

-प्रमोद वसंत बापट

Exit mobile version