उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. मंदिर समितीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भाऊबीजेच्या निमित्ताने गुरुवारी हिवाळ्यानिमित्त मंदिराचे दरवाजे बंद करण्याच्या एक दिवस आधी बुधवारी सकाळी मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम पूर्ण झाले. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, गर्भगृहात सोन्याचे थर अर्पण करण्यासाठी सुमारे ३ दिवस लागले. तसेच रविवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या कामात वेगवेगळ्या आकाराचे ५५० सोन्याचे पत्रे वापरले गेले.
गर्भगृहाच्या भिंती, छत, शिवलिंगाची चौकट, चारही स्तंभ सर्व काही सोन्याने मढवलेले आहे, त्यामुळे मंदिर अधिक भव्य आणि दिव्य दिसू लागले आहे. यापूर्वी केदारनाथ मंदिरातील गर्भगृहाच्या भिंती चांदीच्या अस्तरांनी मढवलेल्या होत्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समितीला मुंबईतील शिवभक्तांच्या वतीने चांदीच्या जागी सोन्याचे अस्तर देण्याचा प्रस्ताव आला होता. समितीने उत्तराखंड सरकारची परवानगी घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र मुंबई या दानशूर शिवभक्ताचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे.
गर्भगृहाची आवश्यक मोजमाप घेतल्यानंतर, त्यानुसार दिल्लीत सोन्याचे पत्रे तयार करण्यात आले आणि ते केदारनाथच्या बेस कॅम्प, गौरीकुंड येथे कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आले. गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत ५५० सोन्याचे पत्रे १८ घोड्यांच्या मदतीने नेण्यात आले. तसेच तेथे पूर्वी चांदीने भिंती मढवल्या होत्या. सोन्याचे पत्रे चढवण्यासाठी २३० किलो चांदी काढावी लागली. त्यानंतर अगोदर तांब्याच्या पत्र्यावर सोन्याचे पत्रे लावण्यात आले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’
आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर
अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक
आठवड्याभरापूर्वी रूरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टीट्यूटचे ६ सदस्यीय पथक दाखल झाले. या पथकाने पुरातत्व खात्याच्या २ अधिकाऱ्यांच्यासमेवत गर्भगृहाची पाहणी केली व नंतर केलेल्या शिफारशीनुसार सोनेरी पत्रे चढवण्यात आले.