डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’

डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. जयंत नारळीकर आपले विचार मांडणार आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसबुक पेजवर सावरकर प्रेमींना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.

या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३८ वी जयंती आहे. दर वर्षी या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाज सेवा पुरस्कार’ देण्यात येतो. या वर्षीचा शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीमधील भारतीय लष्कराचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे. तर समाज सेवा पुरस्कार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे यपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची १३८ वी जयंती शुक्रवार दि. २८ मे २०२१ रोजी आहे. त्या दिवशी हा समारंभ सायंकाळी ७ वाजता होईल.

हे ही वाचा:

गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

‘यास’ वादळाचा मुकाबला करायला भारतीय जवान सज्ज

सीबीआयच्या संचालक पदी सुबोध कुमार जैस्वाल

यावेळी ते ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’ याविषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे तितकेच विज्ञाननिष्ठही होते. त्यासंबंधीची पुस्तकेही सावरकरांनी लिहिली आहेत. दुर्दैवाने सावरकरांच्या या पैलूकडे अनेकदा दुर्लक्ष होते. पण सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सावरकरांच्या याच पैलूवर डॉ.जयंत नारळीकर प्रकाश टाकणार आहेत.

पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर हे एक साहित्यिक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना वाचकांची विशेष पसंती लाभली आहे. नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. पण कोविड महामारीमुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले.

Exit mobile version