पोंगल सणानंतर दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जलिकट्टू पारंपरीक मैदानी खेळाला तामिळनाडू सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सशर्त परवानगी दिली आहे. जलिकट्टू हा तमिळनाडू मधील लोकप्रिय खेळ आहे.
तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या आयोजनाबाबत काही अटी शर्ती ठेवल्या असून त्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वर्तमानपत्रातूनही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
मोकळ्या मैदानात आयोजित केल्या जाणाऱ्या या खेळात ३०० प्रेक्षक येऊ शकतात. जलिकट्टूसोबत ही मर्यादा मंजूविराट्टू या खेळाला देखील लागू होते. तर एरूथूवाराट्टू करता केवळ १५० लोकांना परवानगी आहे. प्रेक्षक जर कोविड निगेटिव्ह असतील तरच त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान मोजले जाईल आणि प्रेक्षकांना सोशल डिस्टंसींगचे पालन करावे लागेल.
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर २०१७ मध्ये हा खेळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कथित प्राणामित्र संघटनांनी या खेळात प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा आक्षेप घेऊन त्यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती. भूत दयेच्या नावाखाली हा हिंदूंच्या प्रथा परंपरांची गळचेपी करणारा डाव असल्याचा आक्षेप काही हिंदूत्ववादी संघटनांनी घेतला होता. परंतु हा खेळाची लोकप्रियता आणि जनभावना लक्षात घेऊन कोर्टाने या खेळावरील बंदी उठवली होती. तमिळनाडूचे ओ. पनीरसेल्वम यांनी केंद्र सरकारडून परवानगी घेऊन या खेळाचे आयोजन केले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकादा या खेळावर बालंट आले असताना पुन्हा एकदा तामिळनाडू सरकारने या खेळाला अभय दिले आहे.