सोमवारी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उत्साहाला भरते आले आहे. या आनंदात ब्रिटनमध्येही कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत हिंदू नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार रॅलीमध्ये ३२५हून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. पश्चिम लंडनच्या कोलियर रोडवरील द सिटी पॅव्हेलियन येथून रॅलीला सुरुवात झाली. यात्रा लंडन पूर्वेकडून निघाली. रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी जय श्रीरामाच्या नावाचा जयघोष केला आणि रामाची भजनेही गायली. संध्याकाळी महाआरतीचे आयोजनही करण्यात आले होते.
राम मंदिर हिंदूंसाठी विशेष स्थान
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या रवी बनोट यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘५०० वर्षांनंतर रामाच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हिंदूंनी न्यायालयात जाऊन ही लढाई जिंकली तेव्हा कुठे मंदिर नशिबात आले. ज्या प्रकारे ख्रिश्चनांसाठी व्हेटिकन सिटीचे विशेष स्थान आहे, ज्या प्रकारे शीखधर्मियांसाठी सुवर्ण मंदिराचे विशेष स्थान आहे, त्याच प्रकारे आता राम मंदिर हिंदूंसाठी विशेष स्थान बनले आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्वातंत्र्यानंतर भारतात होत असलेल्या विकासाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जगभरातील लोकांचा भारतावरचा विश्वास वाढत आहे, हे आश्चर्यचकीत करणारे आहे, असे ते म्हणाले. तर, रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रतिभा चौधरी यांनी मी लोकांमध्ये इतका उत्साह कधी पाहिला नाही, खुद्द प्रभू श्री राम माझ्या घरी येत आहेत, असे मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा:
११० किलो फळफुलांचा अभिषेक, ८१ कलश पाण्याने शुद्ध केले राममंदिर!
उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले!
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच वायूदलाच्या रणरागिणी
नाना, मग सोनियांना पाठवा ना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला
अमेरिकेतही कार-बाइक रॅलीचे आयोजन
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समुदायानेही राजधानी वॉशिंग्टन शहरात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आनंदात बाइक-कार रॅलीचे आयोजन केले होते. हिंदू समाज रॅलीसाठी फ्रेड्रिक सिटी स्थित श्री भक्त आंजनेय मंदिरात एकत्र आले होते.