अयोध्येत श्री राम मंदिराच्या लोकार्पणाबरोबरच पद्मविभूषण जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा अमृतमहोत्सवी जन्मदिनही साजरा करण्यात येणार आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या शिष्यांच्या वतीने १४ ते २२ जानेवारी या कालावधीत अयोध्येत हा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा होणार ही हिंदू समाजासाठी आनंदची बाब असून या ऐतिहासिक घोषणेचा साक्षीदार बनणे हे माझे भाग्य आहे, असे कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी सांगितले. या भव्यदिव्य कार्यक्रमाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून कार्यक्रमाला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा दुहेरी योग आम्हा सगळ्यांसाठी येत असल्याचेही ते म्हणाले. नऊ दिवस साजऱ्या होणाऱ्या या अमृतमहोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या नऊ दिवसांच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास यांनी यासंदर्भात सांगितले की, या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येत लाखो भाविक येणार आहेत. यावेळी अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजनही होणार आहे.
आचार्य रामचंद्र दास यांनी सांगितले की, याच कालावधीत अयोध्येत येणाऱ्या भाविकांना दुहेरी आनंदाची अनुभूती मिळणार आहे. भाविकांना गुरू आणि गोविंद अशा दोघांचाही आशीर्वाद मिळेल. आचार्य रामचंद्र दास यांनी ज्ञानवापी आणि मथुरा वादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्ञानवापी हे नाव घेताच हे हिंदूंचे स्थान आहे, हे पुरेसे स्पष्ट होते. त्यासंदर्भात मुस्लिमांनी खरे तर आपला या जागेवरील दावा सोडून आदर्श उदाहरण घालून दिले पाहिजे.
हे ही वाचा:
भारतात होणाऱ्या G२० परिषदेला व्लादिमीर पुतीन अनुपस्थित ?
भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत
मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह
अजित पवार गटाने शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली, ही फूटचं!
रामचंद्र दास म्हणाले की, अर्थात, एएसआयच्या सर्वेक्षणानंतर खरे काय ते स्पष्ट होईलच. ते म्हणाले की, मथुराचा वादही निरर्थक आहे. सगळ्यांना माहीत आहे की, ती भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे. राममंदिर वादात ज्या पद्धतीने जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी जसे पुरावे दिले तसेच ते मथुरा प्रकरणातही न्यायालयात पुरावे सादर करतील. यावरून हे पूर्णपणे स्पष्ट होईल की, तिथे मंदिर होते आणि तीच ही जागा आहे, जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. देशात धार्मिक स्थळांच्या बाबतीत वादविवाद उत्पन्न होता कामा नये. आम्ही कधीही मक्का मदिनेवर आमचा दावा केलेला नाही.