पाकिस्तानात राहाणाऱ्या हिंदू कुटुंबांना कसा छळाचा सामना करावा लागतो, हे उघडकीस आले आहे. येथील कुटुंबातील मुलींचे अपहरण केले जायचे आणि त्यांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडले जायचे, असे काहींनी सांगितले. या कुटुंबांनी अनुभवलेले, अंगावर शहारा आणणाऱ्या अनुभवाला त्यांनी वाचा फोडली.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या धार्मिक छळामुळे पळून गेलेले नागरिक आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे (सीएए) भारतीय नागरिकत्व मिळवू शकतात. गृह मंत्रालयाकडून १५ मे रोजी ३५० जणांना नागरिकत्व मिळाले. त्यापैकी १४ जणांना बोलावून त्यांना कागदपत्रे देण्यात आली तर इतरांना डिजिटल पद्धतीने नागरिकत्व बहाल करण्यात आले. हे नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. तसेच, त्यांचे जीवन बदलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पाकिस्तानातून पळून आलेल्या कुटुंबातील भावना या मुलीने ‘हे आपल्यासाठी नवीन जीवन मिळण्यासारखे आहे,’ असे म्हटले आहे.
‘आम्हाला तिथे खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले असून त्यांना अभ्यास करता येत नाही. मुस्लिमधर्मीय हिंदू मुलींचे अपहरण करतात आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात. मुली त्यांच्या घरातच राहतात, कारण त्यांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते आणि त्यांना कधी बाहेर जायचे असल्यास त्यांना बुरखा घालावा लागतो. मी अगदी लहान असल्यापासून इथे आले आहे. मला माझ्या पाकिस्तानातील घराशिवाय फारसे काही आठवत नाही. याचे कारण मी माझे घर कधीही सोडले नाही. आमच्या तिथे अजूनही अनेक नातेवाईक आहेत, ज्यांना भारतात यायचे आहे, पण त्यांना व्हिसा मिळणे कठीण जात आहे. आम्ही आमच्या देशात आल्याचा खूप आनंद होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आम्ही त्यांचे आणि अमित शहांचे आभार मानू इच्छितो. सीएए संमत झाल्यावर मला आनंद झाला. मी पुढील शिक्षण घेत असून मला शिक्षक बनायचे आहे आणि इतरांना, विशेषत: महिलांनाही शिकवायचे आहे,’ असा निर्धार भावनाने व्यक्त केला.
भारतीय नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये यशोदा यांचाही समावेश आहे. “मी सन २०१३ मध्ये, १० वर्षांपूर्वी येथे आलो, परंतु आजपर्यंत मला नागरिकत्व मिळालेले नाही. आता आम्ही भारतीय असल्याचा आनंद आहे. आमच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेशही मिळू शकला नाही. आता परिस्थिती अधिक चांगली होईल आणि आम्हाला आता इतर नागरिकांप्रमाणे समान सुविधा उपलब्ध होतील. आम्ही आमच्या मुलांनाही शाळेत पाठवू. नागरिकत्वासाठी आम्ही पंतप्रधान मोदी आणि भारताचे आभार मानतो,’ अशा भावना यशोदा यांनी मांडल्या.
हे ही वाचा:
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला
“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”
होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले
नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!
‘मी गेल्या १३-१४ वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते, मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी नवीन जन्मासारखा आहे. मी भाजपच्या केंद्र सरकारचा खूप आभारी आहे. अधिकार खूप महत्त्वाचे आहेत कारण आता आम्ही उच्च शिक्षण आणि सुरक्षित नोकऱ्या मिळवू शकतो,’ अशी प्रतिक्रिया भारताचे नागरिक झालेले हरीश कुमार यांनी दिली.