नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

मराठा मंडळ, मुलुंडने आयोजित कार्यक्रमात रंगली मुलाखत

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

तब्बल साडेचार महिन्यांचा अत्यंत खडतर प्रवास करून सुमारे ३७०० किमी इतके अंतर पार करत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या रश्मी विचारे यांच्या अनुभव कथनाने मराठा मंडळ, मुलुंडच्या कार्यक्रमातील उपस्थितांनी कृतकृत्य झाल्याचा भाव व्यक्त केला.

मराठा मंडळ, मुलुंडने आपल्या विविध कार्यक्रमांत विशेष करून नर्मदा परिक्रमेवरील या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंडळाच्या इमारतीतील सभागृह या मुलाखतीसाठी खच्चून भरले होते. तब्बल अडीच तास चाललेल्या या मुलाखतीने उपस्थितांना एका वेगळ्याच दुनियेत नेले. नर्मदा परिक्रमेचा मनात आलेला विचार, त्यासाठी केलेली तयारी, त्यात आलेले विलक्षण, चित्ताकर्षक अनुभव, त्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी, कुटुंबाचा पाठिंबा, परिक्रमेचे महत्त्व, नर्मदा मैय्याची परिक्रमावासियांना मिळणारी साथसोबत, ती पाहात असलेली परीक्षा, ज्या ज्या प्रांतातून परिक्रमा केली जाते, तेथील लोकजीवनाचा अनुभव अशा अनेक विषयांवर ही मुलाखत रंगत गेली.

सोनाली सावंत यांनी समर्पक प्रश्न विचारत मुलाखत खुलविली. उपस्थितही या मुलाखतीशी एकजीव झाले. काही अनुभवांचा उल्लेख रश्मी विचारे यांनी केला तेव्हा उपस्थितांना अश्रु आवरले नाहीत. आपल्यालाही अशी नर्मदा परिक्रमा करण्याचा आशीर्वाद मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करत तृप्त मनाने उपस्थित कार्यक्रम झाल्यावर निघाले.

हे ही वाचा:

‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

काश्मीरच्या सार्वजनिक उद्यानात फडकला १०८ फूट उंच तिरंगा

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 

मराठा मंडळ मुलुंडचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या संकल्पनेतून या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मंडळाच्या महिला आघाडीची तोलामोलाची साथ लाभली. सांस्कृतिक विभाग प्रमुख रश्मी राणे यांच्या हस्ते रश्मी विचारे यांचा सन्मान करण्यात आला तर महिला आघाडीच्या निमंत्रक मनिषा साळवी यांनी रश्मी विचारे यांना सन्मानपत्र प्रदान केले आणि त्याचे वाचन मनाली महाडीक यांनी केले. मंडळाचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे सहचिटणीस राजन भोसले यांनी आभारप्रदर्शन केले. नर्मदा परिक्रमेच्या अनुभवाच्या आध्यात्मिक यात्रेचा एक अद्भूत असा सत्संग घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Exit mobile version