जानेवारीच्या अखेरीस अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना; २५ हजार संतांना देणार आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आमंत्रण

जानेवारीच्या अखेरीस अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना; २५ हजार संतांना देणार आमंत्रण

पवित्र अशा अयोध्येच्या भूमीवर श्री राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. दरम्यान, अयोध्येतील मंदिराच्या श्रीरामा मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली २१ ते २३ जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रस्टतर्फे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच त्यांची वेळ देखील मागण्यात आली आहे.

अयोध्यातील मंदिरातील राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही येत्या जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी २१, २२ आणि २३ जानेवारी या तीन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.

२५ हजार संताना आमंत्रित करणार

अयोध्येत हा सोहळा अराजकीय पद्धतीने पार पडणार असून सोहळ्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात येणर आहे. तसेच या सोहळ्यासाठी २५ हजार संताना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची स्वाक्षरी असणाऱ्या निमंत्रण पत्रिका सर्वांना पाठवण्यात येणार आहे. न भूतो न भविष्यती असा सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिनाभर मोफत भोजनाची व्यवस्था

सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महिनाभर मोफत भोजन देण्यात येणार आहे. संपूर्ण जानेवारीमध्ये दररोज ७५ हजार ते १ लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे देशभरात प्रक्षेपण करण्याचीही तयारी सुरू आहे जेणेकरून सारा देश या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेऊ शकेल.

मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

दरम्यान, या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर हे मंदिर आकार घेतं आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही दिवसांपूर्वीच मंदिराचे फोटो समोर आले होते.

हे ही वाचा:

नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता

वसुलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही

यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम कामे पूर्ण केली जाणार आहेत. मंदिराच्या तळ मजल्यावर मूर्ती स्थापन केल्या जातील तर दुसऱ्या मजल्यावर कोणतीही मूर्ती नसणार आहे, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिराचे गर्भगृह अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे की, पहिल्या चैत्र राम नवमीला सूर्याची किरणं थेट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर पडतील. तसेच, एका वेळी ४०० लोक श्रीरामांचं दर्शन घेऊ शकतील.

Exit mobile version