हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत मुंबईत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूल्यवर्धन म्हणजेच राष्ट्रनिर्माण हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरवण्यात आला आहे. यावेळी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारताच्या मानवतावादी भूमिकेबद्दल भाष्य केले.
राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की, कोणीही आम्हाला धर्मनिरपेक्षता काय आहे हे शिकवण्याची आवश्यकता नाही. जगात आपण एकमेव धर्मनिरपेक्ष देश आहोत. भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यू लोकांना येथील मूळ लोकांकडून वाईट वागणूक दिली गेली नाही किंवा त्यांना धमकावले गेलेले नाही.
पुढे राज्यपाल म्हणाले की, कोविड- १९ या महामारीच्या संकटादरम्यान भारताने गरीब देशांना लस दिल्या. अमेरिका आणि काही पाश्चात्य युरोपियन राष्ट्रांप्रमाणे भारताने लसींचे पेटंट मिळवून पैसे मिळवले नाही. आम्हाला मानवतेला वाचवायचे आहे आणि म्हणूनच आम्हाला सामर्थ्यवान बनायचे आहे. धर्माचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळावा (HSSF) संघटनेची गरज आहे. मी यापूर्वी अशा चार मेळाव्यांना भेट दिली आहे; ते श्री गुरुमूर्तींनी आयोजित केले होते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिकवण रुजवण्याची आवश्यकता असण्याच्या महत्त्वावर पुढे बोलताना ते म्हणाले की, मुलांना आपल्या इतिहासाचा, विशेषतः महाभारत, रामायण यांसारख्या ग्रंथांचा अभिमान असायला हवा कारण हे ग्रंथ मानसिक संकटातून कसे बाहेर पडायचे हे शिकवतात.
भव्य हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्याच्या माध्यमातून हिंदू मंदिरे, मठ, साधू संत यांच्या रूपाने मानवकल्याणासाठी कशी सेवा केली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानचे संस्थापक विश्वस्त एस. गुरूमूर्ती यांनी या संकल्पनेमागील भूमिका विषद केली. ते म्हणतात, जगभरातील हिंदूंना एकत्र आणण्यासाठी संघस्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जात असते. हिंदूंचे ऐक्य हीच आमची संकल्पना आहे. आम्हाला माहीत आहे की, हिंदूंमध्ये प्रचंड विविधता आहे. कारण आपण कुणा एकाच्या अधिपत्याखाली नाही. हिंदूंचा कुणी एक मार्गदर्शक नाही, एक धर्मगुरू नाही. आरएसएसचे हेच कार्य आहे की, ही जी विविधता आहे, त्यांना एका धाग्यात बांधणे. अनेक देवीदेवता, अनेक पूजापद्धती, अनेक प्रार्थना ही हिंदूंची विशेषता आहे त्याला एक ओळख देणे हे संघाचे कार्य आहे.
हे ही वाचा:
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं….
उपरकोट जामा मशीद मंदिराच्या जागेवर बांधल्याचा दावा
प्रियांका वाड्रा चांगल्या, राहुल गांधी शिष्ट!
लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना
हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानचे राष्ट्रीय संयोजक गुणवतंसिंह कोठारी म्हणाले की, २००९ पासून हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्यांचा शुभारंभ एस. गुरूमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. चार वर्षे याचा चेन्नईत याचा यशस्वी प्रयोग झाला. हिंदू सेवा करत नाहीत, हा जो मुद्दा उपस्थित केला जात होता, त्याचे उत्तर त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून दिले. हिंदू मंदिर, मठ, साधू संतांच्या रूपात मानवकल्याणासाठी किती प्रकारचे सेवाकार्य केले जाते, हे त्यातून दिसून आले.