मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी सणाला वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी नवे आहेत. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. पण भोगी या शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व .
इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणार भोगी हा सण मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा. भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे म्हटले जाते. या दिवश भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी मुली माहेरी येतात असे म्हटले जाते.
डिसेंबर महिना संपलेला असला तरी या महिन्यात थंडी बऱ्यापैकी असते. प्रामुख्याने या हंगामामध्ये शेतातातील पीक भरलेले असल्याने बाजारात मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात. या हंगामामध्ये मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. सोबतच हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवरची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झालेली असते. या दिवशी शेतकरी या सर्व भाज्या वापरून भोगीची भाजी करतात.
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो. विशेष करून तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा खास भोगीचा बेत करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. भोगीची भाजी तिळाचा कूट घालून केली जाते. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो असे म्हटले जाते . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात.