गणेशोत्सवामुळे संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातवरण आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन शनिवारी करण्यात आले. वसईमधील एका कुटुंबानेही असेच दीड दिवसांनी घरच्या गणपतीचे विसर्जन केले, पण घाईगडबडीत त्यांनी बाप्पाचे डोक्यावरील सोन्याच्या मुकुटासह वसईतील उमेळमान परिसरातील तलावात विसर्जन केले.
ही बाब लक्षात आल्यावर कुटुंब चिंतेत पडलं. मुकुट शोधण्यासाठी मच्छिमार सदानंद भोईर यांनी खोल पाण्यात सूर मारला आणि तब्बल पाऊण तासांनी त्यांनी सोन्याचा मुकुट कुटुंबाच्या स्वाधीन केला.
वसईत उमेळमान गावातील शिवसेनेचे पालघर जिल्हा सचिव विवेक पाटील यांच्याकडे गेली चाळीसवर्षे गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. पाटील यांचे बंधू हरीश पाटील यांनी १९९७ मध्ये घरच्या बाप्प्पाला साडेपाच तोळ्यांचा जवळपास तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट बनवला होता. तेव्हापासून दरवर्षी बाप्पाच्या डोक्यावर हा मुकुट घातला जात असे आणि विसर्जनाच्या वेळी तो काढून ठेवत असत. मात्र या वर्षी गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यावर कुटुंबातील संजय पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि त्यामुळे पाटील कुटुंबाला सुतक लागू झाले. सुतकात गणेशमूर्ती घरात कशी ठेवायची म्हणून गावकऱ्यांनी निर्णय घेत पाटील यांच्या घरातील मूर्ती जवळील तलावात विसर्जित केली.
हे ही वाचा:
दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?
पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद
प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन
घरची परिस्थिती आणि घाईगडबड यामुळे गणेश मूर्तीच्या डोक्यावरील सोन्याच्या मुकुटाचा कुटुंबियांना विसर पडला होता. त्यामुळे मुकुटासहितच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ही बाब लक्षात येताच विवेक पाटील यांनी पाणजू येथील मच्छिमार आणि पट्टीचे पोहणारे सदानंद भोईर यांना संपर्क करून त्यांची मदत घेतली. भोईर यांनी खोल पाण्यात सूर मारून हा सोन्याचा मुकुट शोधला आणि पाटील कुटुंबियांच्या हवाली केला.