अयोध्या: रामलल्लाच्या दर्शनासाठी तीन लाख भाविकांची गर्दी!

प्रभू राम नामाच्या घोषणेने अयोध्या दुमदुमली

अयोध्या: रामलल्लाच्या दर्शनासाठी तीन लाख भाविकांची गर्दी!

अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा अभिषेक सोहळा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी आणि प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत उपस्थित आहेत.प्रभू रामललाचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आजपासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी सकाळपासूनच राम मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होत असून रामभक्त एक एक करून रामललाचे दर्शन घेत आहेत.सकाळी सात वाजल्यापासून भाविक दर्शन घेत आहेत. अयोध्येत रामभक्तांची मोठी गर्दी जमली असून, ती हाताळणे पोलिसांना कठीण होत आहे.

राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना मंदिराचे द्वार खोलण्यात येणार असल्याने भाविकांनी रामललाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लावली होती.मंदिर परिसरात हजारो राम भक्त रांगेत उभे असल्याचे चित्र समोर आले आहे.मंदिर परिसरात रामभक्तांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे अयोध्येत कडाक्याची थंडी असतानाही राम मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली आहे.

आज सकाळी ७ वाजल्यापासून रामललाच्या दर्शनाची प्रक्रिया सुरू आहे. रामलल्लाच्या अभिषेकासाठी लाखो भाविक रामनगरीत पोहोचले असून दररोज लाख ते दीड लाख भाविक राम लल्लाच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जात होती.परंतु आताच्या आकडेवारीनुसार मंदिरात सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.
भगवान रामललाच्या पूजेचे नियमही ठरविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आज पहाटे तीन वाजल्यापासून पूजेची तयारी सुरू झाली. त्यानंतर शृंगार आरतीची तयारी सुरू झाली. सकाळी ७ वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. गर्भगृहात दर्शनासाठी भाविकांना केवळ १५ ते २० सेकंदांचा अवधी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

 

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार दररोज सकाळी ७ वाजल्यापासून रामललाचे दर्शन सुरू होईल. मंदिर परिसर दिवसभर ९ तास खुले राहणार आहे. सकाळी ७ ते ११.३० आणि नंतर दुपारी २ ते ७ या वेळेत दर्शन घेता येणार आहे.राम मंदिराचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले की, आज ६ वेळा रामललाची आरती होणार आहे. मंगला, शृंगार, भोग, उत्थापन, संध्या आणि शयन अशा सहा आरती होणार आहेत.तसेच दुपारी दर तासाला प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

 

दरम्यान, अयोध्या राम मंदिर परिसरात सकाळी ७ वाजता राम मंदिराचे दरवाजे उघडताच राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रामललाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीनंतरही रामभक्त मागे हटत नाहीत. लांबच लांब रांगेत उभे राहून दर्शनासाठी आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. मंदिर परिसर किती गजबजलेला आहे, हे या छायाचित्रांवरून लक्षात येते. मंदिर परिसरात सतत जय श्री रामचा नारा लावला जात असून भाविकांची प्रभू रामांवर असलेली भक्ती यामधून दिसून येत आहे.

 

Exit mobile version