नागालँड मध्ये दरवर्षी एक उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला ‘ हॉर्नबिल फेस्टिवल ‘ म्हणतात, ज्याला ‘ धनेश पक्षी ‘असेही म्हणतात. हा उत्सव नागालँडची समृद्ध संस्कृती, जीवनशैली आणि खाद्य सवयी दर्शवतो. नागालँडच्या आदिवासी योद्धा जमातीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि साधारणपणे १० दिवस साजरा केला जातो. नागा जमातींच्या संस्कृतीत आणि लोककथेत या उत्सवाला महत्त्वाचं स्थान आहे.
अतिशय प्रसिद्ध धनेश महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी, किसमा येथे १२,००० हून अधिक लोकांनी महोत्सवाला भेट दिली. दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सुरुवात झाली.
या प्रसंगी, इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन, अमेरिकेचे महावाणिज्यदूत मेलिंडा पावेक आणि त्यांचे जर्मन समकक्ष मॅनफ्रेड ऑबेर हे देखील उपस्थित होते. पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक टोका ई तुकुमी यांनी सांगितले की, महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी १२,४२० लोकांनी महोत्सवाला भेट दिली आहे. त्यापैकी ९५२७ स्थानिक आणि २८८२ देशांतर्गत प्रवासी होते.
नागालँडचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी नागाच्या पारंपारिक उत्सवाची थाटामाटात सुरुवात केली आहे. या प्रसंगी नागा जनतेशी संवाद साधताना मुखी म्हणाले, ” नागा बंडखोर गटांसोबत बहुप्रतिक्षित शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा दिवस लवकरच येईल. शांततेच्या नव्या पहाटेचे स्वागत प्रत्येकाने आनंदात आणि मनापासून केले पाहिजे. तरुण पिढीने नागा संस्कृतीचा अभिमान बाळगायला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे न्यायला पाहिजे. हॉर्नबिल फेस्टिव्हल हा विविध जमातींसाठी त्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. हे पर्यटन आणि संबंधित आर्थिक घटकांना चालना देण्यासाठी देखील मदत करते.”
या वेळी नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ म्हणाले, ” हॉर्नबिल आपला सर्वात मोठा स्वदेशी सण आहे ज्यामध्ये आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आणि तिची विविधता सर्व भव्यतेने प्रदर्शित केली जाते. प्रत्येक वर्षी नागा संस्कृतीचे अधिकाधिक सामर्थ्य गोळा करून नागालँडमधील पर्यटन वाढवण्यास हा महोत्सव मदत करतो. देशातील आणि परदेशातील अनेक पर्यटक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी नागालँडला भेट देतात. हा सण सध्या नागालँडच्या किसमा ते कोहिमा, मोकोमचुंग, दिमापूर, ओखा या प्रमुख भागांमध्ये साजरा केला जात आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’
अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ
उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी
अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदी
या महोत्सवातीळ ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पारंपारिक कला, लोकगीते आणि खेळ सादर केले जातात. आदिवासी झोपड्यांच्या प्रतिकृती, लाकडी कोरीव काम आणि दिवसाच्या शेवटी ड्रम वाद्ये असलेले आदिवासी जीवन दर्शवले जाते. त्याशिवाय तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आणि दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो व कार्यक्रमात सहभागीही होता येते.