‘बौद्ध हा वेगळा धर्म; हिंदूंनी धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी’

गुजरात सरकारचे निर्देश

‘बौद्ध हा वेगळा धर्म; हिंदूंनी धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी’

बौद्ध, शीख आणि जैन हे वेगळे धर्म आहेत आणि हिंदूंना धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे गुजरात सरकारने म्हटले आहे. त्यामुळे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने आपला धर्म बदलला आणि हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन धर्म स्वीकारला तर त्याला गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा २००३च्या तरतुदीनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे गुजरात सरकारने स्पष्ट केले आहे.

बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठीचे अर्ज नियमांनुसार केले जात नसल्याचे सरकारचे निरीक्षण आहे. गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांच्या वेळी अनेकजण बौद्ध धर्म स्वीकारत होते. मात्र त्यावेळी नियमांचे पालन केले जात नव्हते, असे सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !

कुराण जाळणारा इराकचा सलवान मोमिक जिवंत!

स्विगी डिलिव्हरी बॉयने फ्लॅटबाहेरील शूज चोरले!

बेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

जिल्हा दंडाधिकाऱ्यांची कार्यालये गुजरात धर्मस्वातंत्र्य कायद्याचा एककल्लीपणे अर्थ लावत असल्याचे निदर्शनास आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. ‘काही वेळा अर्जदारांकडून व स्वायत्त संस्थांकडून जे अर्ज मिळतात, त्यांत हिंदू धर्मांतून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचे लिहिलेले असते,’ असे यात नमूद करण्यात आले आहे. ‘पूर्वपरवानगी मागणारे अर्ज सादर केले जातात, अशा प्रकरणांमध्ये घटनेच्या अनुच्छेद २५(२) मध्ये शीख, जैन व बौद्ध यांचा हिंदू धर्मातच समावेश आहे व त्यामुळे अर्जदारांना अशा धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक नसल्याचे सांगून संबंधित अधिकारी असे अर्ज निकाली काढत आहेत,’ असे परिपत्रकात म्हटले आहे.

मात्र, गुजरात धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. हिंदू धर्मातून दुसऱ्या व्यक्तीचे बौद्ध, शीख किंवा जैन धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. याशिवाय धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला विहित नमुन्यात माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल.

Exit mobile version