बनारस हिंदू विद्यापीठात हिंदू अभ्यासक्रम सुरू झाला आहे. हिंदू अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी देणारे बनारस हिंदू विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. १८ जानेवारीपासून या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. इंडिया स्टडीज सेंटरचे समन्वयक प्राध्यापक सदाशिव द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासक्रमासाठी भारतासह परदेशातून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
बुधवार, १९ जानेवारीपासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. २१ जानेवारीपर्यंत या अभ्यासक्रमात प्राथमिक माहिती दिली जाणार असून त्यानंतर २५ जानेवारीपासून साप्ताहिक वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमुळे या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमात हिंदू धर्मातील प्राचीन विद्या आणि धार्मिक शास्त्रांचे वर्ग घेतले जाणार आहेत. लोक गायिका आणि सेंटर फॉर इंडिया स्टडीजच्या अध्यक्षा प्रोफेसर मालिनी अवस्थी, बनारस हिंदू विद्यापीठाच्या रेक्टर प्रोफेसर व्ही के शुक्ला, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे प्रादेशिक संचालक प्रोफेसर विजय कुमार शुक्ला आणि शताब्दी पीठाचे आचार्य प्राध्यापक कमलेश दत्त हे या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. अभ्यासक्रमाचे समन्वयक प्राध्यापक श्रीप्रकाश पांडे आणि इंडिया स्टडीज सेंटरचे प्राध्यापक सदाशिव द्विवेदीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे ही वाचा:
आरोग्यसेविकांना ना पुरेसे वेतन, ना पेन्शन, ना विमा!
‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू
‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’
हा अभ्यासक्रम धर्म विभाग, संस्कृत विभाग, पुरातत्त्व विभाग, प्राचीन भारतीय इतिहास विभाग यांच्या समन्वयाने घेतला जाणार आहे. यातून हिंदू या धर्माविषयीचे अनेक पैलू विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असून जगभरातील विद्यार्थ्यांना हिंदू धर्माची ओळख यातून होणार आहे. वैदिक युगात तत्त्वज्ञान, प्राचीन युद्धकौशल्य यांची प्रगती कशी झाली हे अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे. यासोबतच रामायण, महाभारत, नाटक, भाषाशास्त्र, कालिदास, तुलसीदास, बुद्ध, जैन, स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या मार्गांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे.