मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमध्ये अंतर निर्माण करणारा हिजाब!

मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमध्ये अंतर निर्माण करणारा हिजाब!

‘हिजाब’ या विषयावर ९ फेब्रुवारी २०२२ च्या लेखात आपण यासंबंधातील घटनात्मक तरतुदी आणि इतर देशातील सध्याची परिस्थिती बघितली. आता, ह्या संदर्भात सध्या वृत्तपत्रे व इतर माध्यमांतून जी चर्चा सुरु आहे, त्याचा परामर्श घेऊन यासंबंधी
वैचारिक भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न!

१. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांची भूमिका :

वरवर पहाता मुलींनी काय परिधान करायचे हे त्यांचे त्यांना ठरवू दे”, अशी भूमिका ते घेताना दिसतात पण यामध्ये वास्तविक जे म्हणायचेय, ते मुस्लीम मुलींनी काय परिधान करायचे हे त्यांचे त्यांना ठरवू दे. असे असते ! शाळा /कॉलेजने, एकदा एखादा विशिष्ट पेहराव, गणवेश म्हणून निश्चित केल्यावर, कोणी हिंदू मुलगा / मुलगी त्याखेरीज अन्य पोशाख करण्याचा विचार तरी कधी करू शकते का ? आणि समजा, एखाद्या हिंदू मुलाने / मुलीने त्या गणवेषाखेरीज अन्य कुठला पेहराव परिधान करण्याचा हट्ट धरलाच, तर कोणीही (मग तो उदारमतवादी असो, की धर्मनिरपेक्षतावादी असो), ते ऐकून तरी घेईल का ? अर्थात नाही !  त्यामुळे, इथे प्रश्न अगदी उघड उघड मुस्लीम -हिंदू, किंवा अल्पसंख्य – बहुसंख्य असाच आहे, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

२. ‘हिजाब’ म्हणजे ज्यात चेहरा जवळ जवळ पूर्ण झाकला जातो, असा पेहराव. त्यामुळे त्यामध्ये मुलींना झाकून ठेवण्याची प्रतिगामी प्रथा दिसणे, म्हणजे जे आहे, ते स्वच्छ दिसणे, असेच म्हणावे लागेल. एखादीने स्वेच्छेनेच हिजाबचा स्वीकार केलेला असू शकतो. हे केवळ ‘वादासाठी वाद’, ह्या भूमिकेतूनच ठीक आहे. वस्तुस्थिती हीच आहे, की ती प्रथा बहुतांश मुलींच्या बाबतीत मुस्लीम परम्परावाद्यांकडून अगदी लादली गेलेलीच असते. एकविसाव्या शतकात, कोणती तरुण मुलगी स्वेच्छेने काळा हिजाब / बुरखा परिधान करेल ? मानसशास्त्रात ज्याला स्वपीडन विकृती म्हणतात, ती असेल, तरच हे शक्य होईल.

३. कर्नाटकातील ताजा वाद हा एकूण गणवेश ह्या संकल्पनेलाही समाजाने प्रश्न विचारले पाहिजेत, हे सुचवणारा आहे. हे छद्म धर्मनिरपेक्षता वाद्यांचे आणखी एक म्हणणे ! ह्यांतील समाज नेमका कोणता ? (!) तर अर्थात, बहुसंख्य हिंदू समाज !  कारण अल्पसंख्य मुस्लीम समाजाने मुळातच  आपल्या धार्मिक परंपरेच्या आधारावर गणवेश संकल्पनेला आव्हान दिलेच आहे !

४. शाळा / कॉलेज सारख्या नियमबद्ध संस्थेत, जिथे संस्थेने एक गणवेश सर्वांसाठी निश्चित केलेला आहे, अशा ठिकाणी तो वापरायचा की नाही, हा चर्चेचा मुद्दा असूच शकत नाही. शाळा कॉलेजची, शैक्षणिक संस्थेची किमान  शिस्त म्हणून गणवेश सर्वांनी  स्वीकारावा, अशी अपेक्षा ठेवण्यात गैर काही नाही. ज्यांना आपला पारंपारिक पोशाख अधिक महत्वाचा वाटत असेल, त्यांना दुसऱ्या एखाद्या संस्थेत – जिथे गणवेश नसेल, अशा ठिकाणी – प्रवेश घेण्याची मोकळीक आहेच. कुठलीही शैक्षणिक संस्था कुणावरही, “तुम्ही इथेच प्रवेश घ्या”, अशी सक्ती करत नाही.

(वरील चारही मुद्दे योगेंद्र यादव यांनी लोकसत्तेतील ११ फेब्रुवारी २०२२ च्या लेखातील आहेत. त्या संपूर्ण लेखामध्ये  उदारमतवाद, आधुनिकतावाद, सुबुद्धता, अशा गोंडस (?) नावाखाली अल्पसंख्य समाजाला झुकते माप देण्याचा, त्यांच्या रूढी परंपरांकडे – त्या कितीही प्रतिगामी, मागास असल्या तरीही – दुर्लक्ष करून, त्या आहेत तशाच चालवून घेण्याचा त्यांचा नेहमीचाच प्रयत्न दिसतो. )

५. विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यास विरोध”

मुलींच्या अधिकारासाठी पुढाकार घेण्याचे आय आय एम बंगळूरू मधील प्राध्यापकांचे आवाहन : हे आवाहन फसवे, बुद्धिभेद करणारे आहे. आपण कोणत्याही धर्मातील पुरातन निर्बंधांचे समर्थन करीत नाही असे एकीकडे म्हणतानाच,
दुसरीकडे त्यावरून कोणा एका धर्मातील पद्धतीला लक्ष्य करणे आम्हाला मान्य नाही, असे ते म्हणतात. इथे सरळ सरळ जे झालेच नाही, ते झालेय, असे दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. प्रत्यक्षात काय झाले आहे ? तर एका शिक्षण संस्थेने आपल्या विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी विशिष्ट गणवेश निश्चित केला. आणि काही दिवसापूर्वी अचानक काही मुलींनी त्या नियमाचे पालन न करता, मुस्लीम पारंपारिक प्रथेनुसार हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला. त्यांना अर्थात – गणवेशाच्या कारणावरून – मनाई करण्यात आली. म्हणजे प्रश्न सरळ सरळ शैक्षणिक संस्थेची शिस्त पाळली जाण्याचा आहे. इथे कोणीही कोणालाही लक्ष्य करण्याचा प्रश्नच नाही. जर ह्यांत हट्ट दुराग्रह शोधायचाच झाला, तर तो त्या विद्यार्थिनी करीत आहेत, शिक्षणसंस्था नव्हे. जर एखाद्या संस्थेचे गणवेश वगैरे संबंधी नियम, आणि त्यांची अंमलबजावणी ‘जाचक’ वाटत असेल, तर विद्यार्थी / विद्यार्थिनींना ती संस्था सोडून दुसरीकडे प्रवेश घेण्याची मुभा आहेच.

हे ही वाचा:

इक्बाल कासकरला ईडीकडून होणार अटक

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

हिजाब घालण्याचा हट्ट करत मुलींच्या ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

 

६. अझीम प्रेमजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे निवेदन :

हे ही असेच भ्रामक आहे. पेहरावाच्या मुद्द्यावर शिक्षण नाकारले जात असलेल्या विद्यार्थिनी सोबत…” आपण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पेहरावाच्या मुद्द्यावर शिक्षण कोणाला नाकारले गेले ? कर्नाटकातील घटनाक्रम नीट बघितल्यास, कोणालाही नाही असेच खरे उत्तर दिसते. त्या विशिष्ट मुलींनी गणवेशाचा नियम धाब्यावर बसवून, आपल्याला विशिष्ट (हिजाबधारी) पेहरावात कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, असा दुराग्रह धरला. कॉलेज कडून तो शिस्तीच्या मुद्द्यावर फेटाळला गेला, इतकेच. ह्यांत पेहरावावरून शिक्षण नाकारले जाण्याचा प्रश्नच कुठे येतो ? आपापल्या हिजाबची व्यवस्थित घडी घालून ती बरोबरच्या पर्स / पिशवीत ठेवली असती, तर त्यांना नेहमीप्रमाणे प्रवेश मिळालाच असता !  खरेतर त्या मुलींनीच त्यांच्या हिजाबच्या हट्टापायी शिक्षण नाकारले, असे म्हणावे लागेल, कारण तीच वस्तुस्थिती आहे.

खरेतर आधीच तापलेल्या ह्या वादात, इतर विद्यार्थी, प्राध्यापक, यांनी उगीचच उलट सुलट भूमिका घेऊन, वातावरण आणखी बिघडवू नये. बाजू घ्यायचीच झाली, तर ती – शिस्त, अबाधित शिक्षण, स्त्रियांची प्रतिष्ठा, प्रगतीशील दृष्टीकोन, – या गोष्टींची घ्यावी. त्यातच सर्वांचे हित आहे.

७. हिजाबचा खरा अर्थ : ह्या एकूण प्रकरणात हिजाब, बुरखा  किंवा तत्सम विशिष्ट पेहराव, ह्या सर्वांचा खरा अर्थ ह्या तथाकथित आधुनिकतावादी, छद्मधर्मनिरपेक्षतावादी, बुद्धीजीवींच्या लक्षात आलेला नाही, येत नाही, हे खेदकारक आहे. हिजाब’,बुरखा वगैरेंचा खरा अर्थ आहे – मुस्लीम समाजाची ”आम्ही वेगळे आहोत, ही स्पष्ट धारणा / मानसिकता. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम समाजाची हीच मानसिकता अचूक हेरून, मुस्लीम लीग आणि मोहम्मद अली जिना, यांनी
देशभरातील मुस्लिमांना आपल्यामागे ओढून नेले. त्याची परिणती देशाच्या धर्माधारित फाळणीत झाली, हा इतिहास आहे.

दुर्दैव हे, की आज स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांनी सुद्धा, इथल्या (भारतातल्या) मुस्लीम समाजाची मानसिकता अगदी तीच आहे. आणि आणखी दुर्दैव हे, की आजही त्या अलगतावादी, वेगळेपणा जपण्याच्या  मानसिकतेला, संधिसाधू राजकारणी, बुद्धीजीवी , तथाकथित सेकुलर /सर्वधर्मसमभाववादी लोक, वेगवेगळ्या नावाखाली खतपाणी घालत आहेत. खरा प्रश्न, खरी समस्या मुस्लिमांमधील ही वेगळेपणाची भावना, हा आहे. एरवी नुसती वेगळेपणाची भावना हा प्रश्न गंभीर
झालाही नसता. पण ह्या देशाला धर्माधारित फाळणीचा ताजा इतिहास असल्याने तो अधिक गंभीर बनतो.

हिजाब किंवा विशिष्ट वेशभूषेचा आग्रह, म्हणजे आम्ही वेगळे आहोत त्यानंतर आम्ही वेगळे आहोत, म्हणून आम्हाला वर्गात / सार्वजनिक जागी नमाज पढू द्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने, आम्ही वेगळे आहोत, म्हणून आम्हाला वेगळी भूमी, वेगळा भाग, तोडून द्या! फाळणीची मानसिकता, भूमिका, अगदी हीच होती !

थोडक्यात असे म्हणता येईल, की हिजाब म्हणजे मुस्लीम समाजाच्या वेगळेपणाची  स्पष्ट, आक्रमक, भूमिका, आणि तिचे समर्थन. इथून एक दुष्टचक्र सुरु होते, जे फाळणी पर्यंत जाऊन पोचते. हे एकदा झालेले आहे. ते आज ७५ वर्षांनी पुन्हा सुरु होण्याचा धोका स्वीकारायचा, की नाही, हे इथल्या बहुसंख्य (मुस्लिमेतर) समाजाने – नीट विचार करून, – ठरवायचे आहे. कुठलाही विचारी माणूस हे वास्तव नाकारू शकत नाही, की बहुसंख्य मुस्लिमेतर समाजाने मुस्लिमांच्या ह्या
वेगळेपणाची जबर किंमत फाळणीच्या रूपाने आधीच चुकवलेली आहे. आता पुन्हा तशी किंमत चुकवणे योग्य नाही, ते बहुसंख्य समाजावर अन्यायाचे होईल. हिजाब प्रकरणी बहुसंख्य मुस्लिमेतर समाजाने ठामपणे – हे वेगळेपणाचे कार्ड एकदा (१९४७ मध्ये) खेळून झालेले असल्याने, ते पुन्हा खेळू दिले / सहन केले जाणार नाही. अशीच भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा पूर्वीच्याच दुष्टचक्रातून पुन्हा जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कितीही कटू असली, तरी वस्तुस्थिती हीच आहे.

 

– श्रीकांत पटवर्धन

Exit mobile version