रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा॥
महाबीर बिक्रम बजरंगी।

हनुमान म्हणजे हिंदू देवतांमधील एक आराध्यदैवत आणि रामायणातील सुविख्यात असे रामभक्त वानर. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हनुमान हा  किष्किंधेचा वानर राजा सुग्रीव याचा अमात्य. सुमेरूचे राजे केसरी आणि गौतमकन्या अंजनी यांचे पुत्र म्हणजे हनुमान.

मारुती, बजरंगबली, बलभीम, बजरंग, आंजनेय, रामदूत, केसरीनंदन, वायुपुत्र, वज्रांग, संकटमोचन, पवनकुमार, पवनसुत,  महावीर, महारुद्र आदी नावांनीही हनुमान यांचा उल्लेख केला जातो.  सीतेचा शोध, अशोक वन विध्वंस, लंकादहन या हनुमानाच्या अलौकिक अशा शौर्यगाथा आहेत. हनुमानविषयी अनेक दंत-कथा प्रचलित आहेत.

हनुमान नाव का?

माता अंजनी हनुमानाला कुटीत झोपवून कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने जेव्हा छोट्या हनुमानाला जाग आली, तेव्हा त्याला प्रचंड भूक लागली होती. तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. झाडाच्या आडून दिसणारा लाल रंगाचा गोळा म्हणजे झाडाला लागलेलं फळ आहे. आपली भूक मिटेल म्हणून त्यांनी तो गोळा खाण्यासाठी उडी घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी म्हणून इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाच्या हनुवटीला दुखापत होऊन त्याचे तोंड वाकडे झाले आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर हनुमानाची ही अवस्था बघून पवन देवाला क्रोध अनावर झाला. त्याने त्याच क्षणी आपली गती रोखली. त्यामुळे कोणताही जीव श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर ब्रम्हदेवाने हनुमानाला शुद्धीवर आणले आणि तेव्हाच मग प्रसन्न होऊन वायुदेवाने पुन्हा सृष्टीमध्ये वायूचा संचार केला. तेव्हा ब्रम्हदेवाने हनुमानाला वरदान दिले की, कोणतेही शस्त्र हनुमानाचे शरीर छेदू शकणार नाही. वरूण देवाने सांगितले की, माझा पाश आणि जल यांच्यापासून हा बालक सदैव सुरक्षित राहील. इंद्राने म्हटले की याचे शरीर वज्रापेक्षा देखील कठीण असे बनेल आणि माझ्या वज्राचा देखील याच्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. सूर्यदेवाने सांगितले की, मी याला माझ्या तेजातला शतांश देतो. यमदेवाने अवध्य आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद दिला. याक्षाराज कुबेर, विश्वकर्मा आदी देवतांनीही हनुमानाला वरदाने दिली. या बालकाची हनुवटी वज्रामुळे तुटली होती, त्यामुळे त्याचे नाव हनुमान असे पडले.

… आणि हनुमानाने सोन्याची लंका जाळली

श्री राम हे वनवासात असताना त्यांची आणि हनुमानाची भेट झाली. सीतेच्या शोधात हनुमानाने प्रभू राम यांची मोठी मदत केली. सीतामाईला शोधायला म्हणून हनुमानाने झेप घेऊन लंका गाठली. तिथे जाऊन सीतामाईला शोधून त्याने प्रभू रामांचा निरोप सीतेला दिला. तसेच आपल्याबरोबर माघारी येण्याची विनंतीही त्याने सीतामाईला केली. मात्र, आपल्याला सोडवायला प्रभू रामांनी यावे असे सीतेने त्याला सांगितले आणि माघारी पाठवले. त्यानंतर लंकाधिपती रावणाच्या रक्षकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले आणि त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून आग लावली. मात्र, हनुमानाने तेव्हा घरांघरांवर, झाडांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि लंका सोडली. परतल्यावर त्याने सीतेची खुशाली आणि निरोप प्रभूंना कळवला.

… आणि हनुमानाने पर्वत आणला उचलून

रामाने वानरसेनेच्या मदतीने रामसेतू उभारला आणि लंका गाठली. सीतेच्या सुटकेसाठी रामाने रावणाशी मोठे युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. या युद्धाच्या दरम्यान जेव्हा लक्ष्मणाला बाण लागून बेशुद्ध पडला होता. तेव्हा लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी औषधी वनस्पतीची आवश्यकता होती. पण संजीवनी वनस्पती ओळखू न शकल्यानं हनुमानाने पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. त्यानंतर उपचारानंतर लक्ष्मण परत शुद्धीवर आला आणि त्याचे प्राण वाचले.

हे ही वाचा:

सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले …..

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

 

हनुमानाच्या हृदयात प्रभू श्रीराम आणि जननी सीतेचे दर्शन

रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येचे राजा बनले. श्रीरामाच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येची राणी, सीतेने रावणासोबतच्या युद्धात मदत केल्यामुळे प्रसन्न होऊन तिथे उपस्थित सर्वांना मोत्याची माळ भेट दिली. सरतेशेवटी सीतेने श्रीरामाचा परम भक्त हनुमानाला सुद्धा शुभ्र, सुंदर अशी आकर्षक मोत्यांची माळ भेट म्हणून दिली. तेव्हा हनुमान त्या माळेतील एक एक मोती दाताने तोडू लागले. हनुमानाच्या अशा वागण्याने सीताने त्याला कृतीचे कारण विचारले. तेव्हा भावनिक झालेल्या हनुमानाने सीता माईला म्हटले, “सीता माई मला ही माळ तोडायची इच्छा नव्हती पण ज्यात श्रीरामांचा वास नाही, म्हणजे ते राहत नाहीत, दिसत नाहीत ती वस्तू माझ्यासाठी काहीही उपयोगाची नाही.” तेव्हा सीतेने हनुमानाच्या भक्तीची परीक्षा घेत हनुमानाला विचारले की, “तुझ्या शरीरात तरी श्रीराम वसतात का?” तेव्हा हनुमानाने स्वतःची छाती फाडली. त्यांच्या छाती मध्ये त्रैलोक्याचे पालनहार श्रीराम आणि जननी सीता होत्या.

अशा या प्रभू श्रीरामांचा परमभक्त असलेल्या हनुमानाच्या शौर्याच्या, त्याच्या निस्सीम भक्तीच्या कथा प्रचलित आहेत.

Exit mobile version